पाटोदा, १९ ऑगस्ट (गणेश शेवाळे): पाटोदा शहरातून जाणाऱ्या पाटोदा-मांजरसुंभा राष्ट्रीय महामार्गावर महावितरणने रस्त्याच्या अगदी कडेला विद्युत डीपी (ट्रान्सफॉर्मर) बसवल्यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. महावितरणच्या या बेजबाबदारपणामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता असून, स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. भविष्यात कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विद्युत डीपी महामार्गाच्या अगदी कडेलाच आहे आणि तो अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. त्याच्या जवळच एक मोठा खड्डा पडला असून, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक, रिफ्लेक्टर किंवा सुरक्षेची चिन्हे लावलेली नाहीत. रात्रीच्या वेळी किंवा खराब हवामानात हा डीपी आणि खड्डा वाहनचालकांना सहज दिसत नाही, ज्यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच ठिकाणी यापूर्वीही किरकोळ अपघात झाल्याची नोंद स्थानिक लोकांनी केली आहे, ज्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महावितरणच्या कामावर प्रश्नचिन्ह
सार्वजनिक सुरक्षा लक्षात न घेता, महावितरणने महामार्गालगतच विद्युत डीपी बसवल्याबद्दल तीव्र टीका होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. नागरिकांच्या मते, हा ट्रान्सफॉर्मर सुरक्षित आणि योग्य ठिकाणी हलवणे अत्यावश्यक आहे. मात्र, वारंवार तक्रारी करूनही या दोन्ही विभागांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. या बेजबाबदारपणामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
या गंभीर स्थितीवर तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी दिला आहे. जर या धोक्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव गेला, तर संबंधित महावितरण अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा अल्टिमेटम त्यांनी दिला आहे. ‘मनुष्यहानी होण्याआधी ही विद्युत डीपी तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल,’ असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. सध्या या घटनेमुळे पाटोदा परिसरात तणावाचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.