Ticker Icon Start
पोलीस भरती
Beed

‘हरित बीड’ अभियानाला हरताळ! जिल्हा कारागृहात ५० झाडांची कत्तल, प्रशासनावर कारवाईची मागणी

बीड, ०८ सप्टेंबर (विशेष प्रतिनिधी): बीडमध्ये ‘हरित महाराष्ट्र’ धर्तीवर नुकत्याच पार पडलेल्या ‘हरित बीड अभियाना’अंतर्गत एकाच दिवशी ३० लाख वृक्ष लागवडीचा विक्रमी टप्पा गाठून त्याची नोंद ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली असतानाच, या अभियानाला हरताळ फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी बीड जिल्हा कारागृहाच्या आवारात ४०-५० वर्षांची जुनी असलेली ५० हून अधिक झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली. या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या वृक्षप्रेमींनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने केली.

नेमकी घटना काय घडली?

गेल्या महिन्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ‘हरित बीड अभियान’ राबवण्यात आले होते. या अभियानामुळे जिल्ह्याच्या पर्यावरणाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच बीड जिल्हा कारागृहाच्या आवारातील लिंब, चिंच, कवठ, शेवरी, वड यांसारखी मोठी आणि जुनी झाडे बुंध्यापासून कापून टाकण्यात आली. विशेष म्हणजे, ही झाडे शासकीय मालमत्ता असतानाही त्यांची विल्हेवाट लावण्याची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही. तोडलेल्या झाडांची लाकडे खासगी वाहनाने बाहेर नेण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे.

प्रशासकीय कारवाईची मागणी का?

एकीकडे शासन आणि प्रशासन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणासाठी पुढाकार घेत असताना, शासकीय कार्यालयाच्या आवारातच अशी बेकायदेशीर वृक्षतोड होणे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. यामुळे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संदेशालाच हरताळ फासला गेला आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्यावर तातडीने प्रशासकीय तसेच दंडात्मक कारवाई केली जावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

या मागणीसाठी डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. ‘हरित बीड अभियानाला हरताळ फासणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलकांनी या प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना एक निवेदन दिले. हे निवेदन नगरपरिषद मुख्याधिकारी, वन विभागीय अधिकारी यांच्यामार्फत पालकमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, वनमंत्री गणेश नाईक आणि कारागृह विशेष महानिरीक्षक यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.

आंदोलनात कोण सहभागी झाले?

या निदर्शनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर, पोलीस हवालदार संतोष राऊत, सुनील राठोड, महिला पोलीस सुनीता राठोड आणि सुनंदा गुळवे हे घटनास्थळी उपस्थित होते.

या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये अशोक येडे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक), वृक्षप्रेमी अभिमान खरसाडे, डी.जी. तांदळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा, बीड), नितीन जायभाये (अध्यक्ष, बीड शहर बचाव मंच), सय्यद सादेक (बीड शहराध्यक्ष, आप) आणि सुदाम तांदळे, शेख मुबीन आदी मान्यवर उपस्थित होते. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *

Back to top button