ऊस दरावरून बीडमध्ये संघर्ष पेटला; ‘जो जास्त भाव देईल, त्यालाच ऊस द्या’ – दत्ता वाकसे यांचे आवाहन

 

बीड, १९ नोव्हेंबर (विशेष प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीलाच दराचा प्रश्न चांगलाच तापला आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदार गब्बर होत असून ऊस उत्पादक शेतकरी मात्र देशोधडीला लागत आहे, अशी संतप्त भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यातच आता मल्हार ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता वाकसे यांनी कारखानदारांच्या मनमानी कारभारावर सडकून टीका केली आहे. जो कारखानदार एफआरपी (FRP) पेक्षा जास्त आणि योग्य भाव देईल, केवळ त्याच कारखान्याला ऊस द्या, असे आवाहन वाकसे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

कारखानदारांची भरभराट, शेतकरी मात्र संकटात

बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असताना, दुसरीकडे साखर कारखानदारांची संपत्ती मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. या विरोधाभासावर बोट ठेवताना दत्ता वाकसे यांनी अत्यंत कडक शब्दांत समाचार घेतला. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कारखानदार गडगंज होत असून त्यांनी टोलेजंग बंगले बांधले आहेत. मात्र, ज्यांच्या कष्टावर हे वैभव उभे राहिले, त्या शेतकऱ्यांच्या उसाला मात्र योग्य भाव मिळत नाही. कारखानदारांचे हे वागणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना एफआरपीनुसार भाव देणे बंधनकारक केले आहे. तरीही, अनेक कारखानदार स्वतःच्या सोयीने आणि मनमानी पद्धतीने भाव ठरवत आहेत. विशेषतः उसाची ‘रिकव्हरी’ (उतारा) कमी दाखवून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप वाकसे यांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी भूमिका घेण्याची वेळ

शेतकऱ्यांनी आता भोळेपणा सोडला पाहिजे, असे आवाहन करताना वाकसे म्हणाले की, शेतकरी आता पूर्वीसारखा ‘दूधखुळा’ राहिलेला नाही. ज्या कारखानदारांना शेतकऱ्यांच्या घामाची किंमत नाही, त्यांची मस्ती उतरवण्याची हीच खरी वेळ आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादकांनी एकजूट दाखवत, जो कारखाना पारदर्शक व्यवहार करेल आणि योग्य दर देईल, त्यांच्याच गव्हाणीत ऊस टाकावा. जे भाव देणार नाहीत, त्यांची अडवणूक करून त्यांना ताळ्यावर आणणे काळाची गरज बनली आहे.

आमदार प्रकाश सोळंकेंवर गंभीर आरोप

यावेळी दत्ता वाकसे यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा प्रकाश सोळंके यांच्यावर निशाणा साधला. सोळंके हे शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. वाकसे यांच्या म्हणण्यानुसार, आमदार सोळंके हे आपल्या राजकीय वजनाचा वापर करून इतर कारखानदारांवर दबाव टाकत आहेत.

जर इतर खाजगी किंवा सहकारी कारखाने शेतकऱ्यांना जादा दर देण्यास तयार असतील, तर त्यांना तसे करण्यापासून रोखले जात आहे. “स्वतःच्या कारखान्यातून कवडीमोल भाव द्यायचा आणि इतर कारखान्यांना जास्त भाव देण्यापासून दमदाटी करून रोखायचे,” असा दुहेरी अन्याय सध्या सुरू आहे. प्रकाश सोळंके हे शेतकऱ्यांना गचंडीला धरून आपल्या कारखान्याकडे ऊस वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आता शेतकरी हे खपवून घेणार नाहीत, असा इशारा वाकसे यांनी दिला आहे.

आगामी काळात शेतकऱ्यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला नाही, तर जगणे मुश्किल होईल. त्यामुळे ऊस दराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी संघटित होऊन, जो जास्त पैसे देईल त्यालाच ऊस देण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन मल्हार ब्रिगेडने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *