परळी मतदारसंघात २९२ हायमास्ट दिव्यांसाठी २५१५ मधून दिला ४ कोटी ३८ लाखाचा निधी
परळी दि. २५ : परळी मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांची संकल्पना असलेल्या ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या योजनेतंर्गत १४६ गांवे हायमास्ट दिव्यांनी उजळली आहेत, यासाठी २९२ हायमास्ट दिव्यांसाठी त्यांनी मुलभूत विकास निधीतून ४ कोटी ३८ लाख रूपयांचा निधी दिला आहे.
पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी सत्तेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे रूप पालटण्यासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या आहेत. ग्रामीण रस्ते, नाल्या, पाण्याच्या योजना, सभागृह, तीर्थक्षेत्र विकास, स्मशानभूमी शेड, प्रवासी निवारा आदी विकास कामे त्यांनी गांवा-गांवात पोहोचविली. आता प्रत्येक गावांत त्यांनी ‘अंधारातून प्रकाशाकडे’ योजना राबविण्यासाठी संकल्पना मांडली आणि ती अंमलात देखील आणली. ग्रामविकास विभागाच्या २५१५ योजनेतंर्गत या कामासाठी ४ कोटी ३८ लाख रुपये निधी त्यांनी मंजूर केला असून यातून परळी तालुक्यातील ८९ आणि अंबाजोगाई तालुक्यातील मतदारसंघात समाविष्ट असलेल्या ५७ अशा एकूण १४६ गावांमध्ये २९२ हायमास्ट दिवे बसविण्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. खेडे गावांतील प्रमुख चौक आतापर्यंत अंधारात असायचे परंतु या संकल्पनेमुळे आता संपूर्ण गांव प्रकाशमय होणार आहे. प्रत्येक गावांत प्रमुख ठिकाणी दोन हायमास्ट दिवे बसविले जात असून त्याचा लख्ख प्रकाश दुरवर जात आहे. या दिव्यांमुळे गांवचा अंधार दूर झाल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. या हायमास्ट दिव्यांचे वीज देयक संबंधित ग्रामपंचायतीने अदा करायचे आहे.
ग्रामस्थांनी मानले आभार
शहरात असणारे हायमास्ट दिवे आता खेड्यातही दिसू लागले आहेत. पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्यामुळे हे शक्य झाले आहे. त्यांनी निधी मंजूर करून ही संकल्पना ग्रामविकास विभागामार्फत राबविल्याने खेडेही लख्ख प्रकाशाने उजळून गेली आहेत, ही योजना प्रभावीपणे अंमलात आणल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.