अंबाजोगाई (प्रतिनिधी): बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार (भा.प्र.से) यांचे आदेशानुसार येथील पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालया मार्फत प्रशासकीय कामकाज विशेषतः आस्थापना विषयक कामकाज सुरळीत होण्याच्या दृष्टीकोनातून अतिरिक्त पदभार पुढील आदेशापर्यंत सहाय्यक प्रकल्प अधिकारी (निरंतर शिक्षण) चंदन दिलीपराव कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.कुलकर्णी यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे.
चंदन दिलीपराव कुलकर्णी हे अंबाजोगाईचे भूमिपुञ आहेत.त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे अंबाजोगाईतच झाले आहे.त्यामुळे भूमिपुञ असणा-या नुतन गटशिक्षणाधिकारी यांना अंबाजोगाईच्या शैक्षणिक समस्यांची जाण आहे.शैक्षणिक वातावरण ज्ञात आहे त्यामुळे कुलकर्णी हे या पदाला न्याय देवून शिक्षण क्षेत्राची उंची वाढवतील अशा प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत.चंदन कुलकर्णी यांचे शिक्षण एम.एस.सी, भौतिकशास्त्र (विज्ञान शाखा ),एम.एड.,सेट,नेट (मानव्यविद्या शाखा),डी.बी.एम (व्यवस्थापनशास्ञ शाखा) असे आहे.त्यांना अध्यापनाचा 10 आणि प्रशासनाचा 7 असा दोन्हीची सांगड असलेला एकूण 17 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.केंद्र व राज्यस्तरांवरील एन.सी.इ.आर.टी., एस.सी.इ.आर.टी., बालभारती, एस.एस.सी बोर्ड या संस्थांमध्ये पाठ्यपुस्तक निर्मिती, अभ्यासक्रम विकसन, सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन,वयानुरूप प्रवेशितांचे विशेष शिक्षण,शैक्षणिक प्रगती चाचणींचे विकसन,राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस),राज्य संपादणूक सर्वेक्षण (एसएलएएस),गणित संबोध प्रशिक्षणे, अध्ययन नि:ष्पत्ती कार्यशाळा अशा अनेक महत्वपूर्ण कार्यक्रमात निर्मिती, संपादन आणि विकसन कार्य यासह 80 हून अधिक चर्चासञांत चंदन कुलकर्णी यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. कुलकर्णी हे उत्तम वाचक, लेखक आणि साहित्यप्रेमी आहेत. विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने चंदन कुलकर्णी यांच्या सारख्या अंबाजोगाईचा शैक्षणिक, सांस्कृतिक वारसा पुढे नेवू शकेल अशा उच्च विद्याविभूषीत व कुशल अधिका-याकडे अंबाजोगाई गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा पदभार सोपविल्यामुळे कुलकर्णी यांच्या नियुक्तीचे समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
अंबाजोगाईचे शैक्षणिक गतवैभव प्राप्त करून देण्यास कटीबध्द
बीड जिल्हा परीषद प्रशासनाचे मुख्यकार्यकारी अधिकारी कुंभार साहेब यांनी आपल्या नियुक्तीचा घेतलेला निर्णय सार्थ ठरवू,सर्वांना सोबत घेवून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून अंबाजोगाईचे शैक्षणिक गतवैभव प्राप्त करून देण्यास आपण कटीबध्द आहोत.सध्या कोरोना संकटकाळात शाळा बंद असल्या तरीही आपण विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू देणार नाही.तालुक्यातील शैक्षणिक समस्यांची प्राथमिकता ठरवून प्राधान्यक्रमानुसार त्या समस्या सोडविणार.
-चंदन कुलकर्णी,गटशिक्षणाधिकारी (अतिरिक्त पदभार), पंचायत समिती, अंबाजोगाई.