लिंबागणेश: (दि. ०९) – अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. साठवणूक केलेला आणि बाजारात विक्रीसाठी तयार असलेला कांदा वादळी वाऱ्यासह आलेल्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सडला आहे. जमिनीतील ओलावा वाढल्याने कांद्याच्या साठवणुकीवर परिणाम झाला असून, कांद्याला ओल लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा मिळेल त्या भावात विकावा लागणार असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे.
“आधीच कांद्याला भाव नाही, त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणल्याप्रमाणे अवकाळी पाऊस. शेतकऱ्यांनी जगायचं कसं?” असा सवाल लिंबागणेश येथील कांदा उत्पादक शेतकरी कल्याण वाणी यांनी केला.

कल्याण भालचंद्र वाणी यांनी डॉ. गणेश ढवळे यांच्याशी बोलताना आपली व्यथा मांडली. त्यांनी सांगितले की, त्यांनी साडेतीन एकर कांद्याची लागवड केली होती. रोपे, बियाणे, खत, फवारणी आदींवर दोन लाख रुपयांहून अधिक खर्च आला आहे. अवकाळी पावसाने काही कांदा शेतातच सडला, तर काढून झाकून ठेवलेला कांदा पाण्याखाली जाऊन काळपट पडला आहे. काही कांद्याला कोंब फुटले आहेत. सध्या चांगल्या कांद्याला १५ रुपये प्रति किलोपर्यंत भाव मिळत असला तरी, या काळपट पडलेल्या कांद्याला कोण विचारणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “सरकारचे धोरण चुकीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणल्याप्रमाणे अवकाळी पाऊस. महसूलचे अधिकारी पंचनाम्यासाठी फिरकत नाहीत. आता तुम्हीच सांगा, शेतकऱ्यांनी कसं जगायचं?” असा उद्विग्न सवाल वाणी यांनी केला.
कृषीमंत्र्यांच्या असंवेदनशील वक्तव्याने शेतकरी संतप्त
गेल्या आठवड्यात सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना, शेतातून बाहेर काढून ठेवलेल्या कांद्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी असंवेदनशीलपणे “काढलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करायचे? ढेकळाचे पंचनामे करायचे का?” असा सवाल शेतकऱ्यांनाच विचारला. तसेच, शेतात पडलेल्या कांद्याचे पंचनामे करणे नियमात बसत नाही, असे म्हणत शेतकऱ्यांबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मानसिकता नसल्याचे दाखवून दिले.
यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. गणेश ढवळे म्हणाले, “कृषीमंत्री जिथे ‘ढेकळाचे पंचनामे करायचे का?’ म्हणत असतील, तिथे महसूल प्रशासन पंचनामे कसे करणार? त्यामुळे महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी पंचनामे करायला कशाला पुढाकार घेतील?” असा सवाल त्यांनी विचारला. कृषीमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आणि संतापाची लाट पसरली आहे.
