“आणखी पालकांना तक्रार करायची असल्यास शासनाकडून संपूर्ण सुरक्षा मिळेल” – पंकजाताई मुंडे यांचे आवाहन
बीड, ३० जून (प्रतिनिधी): बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात दोषी असलेल्या आरोपींवर कठोर आणि कायद्यानुसार कडक कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिल्या आहेत.
या गंभीर घटनेसंदर्भात मंत्री पंकजाताई मुंडे यांनी नुकतीच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी थेट संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली. उमाकिरण शैक्षणिक संकुलातील शिक्षक प्रशांत खटावकर आणि विजय पवार या दोघांनी एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीचे गेल्या एक वर्षापासून लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित विद्यार्थिनीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल केल्यानंतर, मंत्री पंकजाताई मुंडे यांनी तात्काळ पोलीस अधीक्षकांना दूरध्वनी करून आरोपींना विनाविलंब अटक करण्याचे निर्देश दिले होते.
ही घटना अत्यंत संतापजनक असून बीड जिल्ह्याला काळिमा फासणारी आहे. शिक्षकांनी केलेले हे कृत्य अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी, त्यांना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये किंवा ते सुटून जाऊ नयेत यासाठी त्यांच्यावर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही सूचना मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. या संदर्भात इतर कोणत्याही पालकांना आपल्या पाल्यासोबत घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनेची तक्रार करायची असल्यास, त्यांना शासनाकडून संपूर्ण सुरक्षा पुरविली जाईल. त्यामुळे त्यांनी पुढे येऊन निर्भयपणे तक्रार करावी, असे कळकळीचे आवाहनही पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
