आष्टी, १४ जुलै (प्रतिनिधी): बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये मराठा समाजातील तरुण-तरुणींचे विवाह जुळवणे ही एक मोठी समस्या बनली आहे. बेरोजगारी, शिक्षण आणि आरक्षणासारख्या ज्वलंत प्रश्नांबरोबरच विवाहाचा प्रश्नही तितकाच गंभीर बनला आहे. पूर्वी विवाह जुळवण्यात मध्यस्थ आणि नातेवाईक महत्त्वाची भूमिका बजावत असत, मात्र आता त्यांची संख्या कमी झाल्याने ही समस्या अधिकच बिकट झाली आहे. यावर उपाय म्हणून मराठा सेवा संघाने पुढाकार घेऊन बीड जिल्ह्यातील आष्टी येथे भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती मराठा वधू-वर कक्षाचे अध्यक्ष शिवश्री शिवाजीराव पाचे यांनी दिली.
हा महत्त्वपूर्ण मेळावा रविवार, दिनांक २७ जुलै, २०२५ रोजी आष्टी येथील राजमाता जिजाऊ विद्यार्थी वसतिगृह व मंगल कार्यालयात सकाळी ८:३० ते दुपारी ४:३० या वेळेत संपन्न होणार आहे. हा मेळावा केवळ मराठा समाजातील वधू-वरांकरिता मर्यादित असून, समाजातील विवाहविषयक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे समाजातील स्थळे एकाच छताखाली येतील आणि विवाह जुळवण्याची प्रक्रिया सुलभ होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. मेळाव्याविषयी अधिक माहितीसाठी इच्छुक वधू-वर व पालकांनी ॲड. सीताराम पोकळे यांच्याशी ९४२१६३८०५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या भव्य मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री तथा आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री. सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथर्डी येथील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी सल्लागार मा. जे. आर. पवार सर हे असणार आहेत.
यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोकजी ठाकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षाताई माने, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री धनंजय शेंडगे व शिवश्री नागनाथ जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा शिवमती संगीताताई शिंदे आणि जिजाऊ ब्रिगेड अहमदनगरच्या अध्यक्षा शिवमती संपूर्णताई सावंत यांसारख्या अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या मेळाव्यासाठी बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने वधू-वर आणि त्यांचे पालक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या उपक्रमामुळे मराठा समाजातील लग्नइच्छुकांना योग्य जोडीदार निवडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे समाजातील तरुण-तरुणींनी आणि पालकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवश्री शिवाजीराव पाचे यांनी केले आहे.