बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

कृषी विभागाच्या अहवालाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; दुबार पेरणीचे संकट असताना ‘पीक परिस्थिती उत्तम’ असल्याचा दावा – डॉ.गणेश ढवळे

बीड, १५ जुलै (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात मागील तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. पाण्याअभावी कोवळी पिके माना टाकत असून, अनेक ठिकाणी रोपे सुकून चालली आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे गडद संकट घोंगावत असताना, जिल्हा कृषी विभागाने मात्र ‘जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती छान आहे’ असा अजब दावा आपल्या अहवालात केला आहे. या असंवेदनशील उल्लेखाने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी, “कृषी विभागाचे डोके ठिकाणावर आहे काय?” असा थेट सवाल विचारला असून, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी शेतकऱ्यांच्या या भावनांना वाचा फोडली आहे.

जिल्ह्यातील भीषण वास्तव आणि प्रशासकीय उदासीनता

बीड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ९ जुलै अखेर ८४.२३ टक्के म्हणजेच ६ लाख ८१ हजार ३९८ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, पेरणीनंतर पावसाने पूर्णतः पाठ फिरवली आहे. १ जून ते ९ जुलै या कालावधीत जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १९४.१ मिमी अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ १४०.८ मिमी पाऊस झाला आहे. धारूर तालुक्यात सर्वात कमी, केवळ ४६.१ मिमी पावसाची नोंद झाली, तर वडवणी तालुक्यात सर्वाधिक १२९ मिमी पाऊस झाला आहे.

गेल्या जवळपास २१ दिवसांपासून पावसाचा एकही थेंब न पडल्याने जमिनीतील ओलावा संपला आहे. यामुळे उगवून आलेली सोयाबीन, कापूस, तूर आणि बाजरी यांसारखी पिके सुकू लागली आहेत. शेतकरी डोळ्यात प्राण आणून पावसाची वाट पाहत असताना, कृषी विभागाच्या ९ जुलै रोजीच्या अहवालाने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

वातानुकूलित कार्यालयातील अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

लिंबागणेश येथील प्रगतशील शेतकरी मोहनराव कोटुळे यांनी आपला संताप व्यक्त करताना म्हटले की, “आम्ही शेतात राबराब राबतो, आमची पिके डोळ्यांदेखत जळून जात आहेत आणि अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसून पीक परिस्थिती उत्तम असल्याचे खोटे अहवाल देतात. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे.” त्यांच्यासोबतच दामोधर थोरात, श्रीहरी निर्मळ, चंद्रकांत आवसरे, रमेश गायकवाड, रामचंद्र मुळे आणि प्रमोद निर्मळ या शेतकऱ्यांनीही कृषी विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पिकांवरील रोगराई आणि कृषी विभागाचा बेजबाबदार दावा

यंदा जिल्ह्यात कापसाऐवजी सोयाबीनचा पेरा अधिक आहे. पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली असून, त्यावर पाने खाणाऱ्या अळीचा आणि काही प्रमाणात खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही बाब खुद्द कृषी विभागाने आपल्या अहवालात मान्य केली आहे. मात्र, याच अहवालात पुढे “यामुळे पिकांचे आर्थिक नुकसान होणारे नाही” असा उल्लेख करून शेतकऱ्यांच्या चिंतेची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, जो अत्यंत बेजबाबदारपणाचा ठरला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर आवाज उठवताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) म्हणाले, “एकीकडे शेतकरी हवालदिल झाला आहे, त्याला दुबार पेरणीसाठी पैशांची चिंता लागली आहे. दुसरीकडे, कृषी विभाग वस्तुस्थिती नाकारून सर्व काही आलबेल असल्याचे भासवत आहे. हा शेतकऱ्यांप्रति असलेला असंवेदनशील दृष्टिकोन आहे. प्रशासनाने तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना जाहीर कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button