बीड, १६ जुलै (प्रतिनिधी): लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान, बेलगावच्या सचिवपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी महंत तुकाराम महाराज भारती यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीनिमित्त आणि अभिष्टचिंतन सोहळ्याच्या औचित्याने संस्थानामध्ये एका भव्य कीर्तन आणि सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नामवंत संत-महंत, कीर्तनकार आणि हजारो भाविक भक्त उपस्थित होते, ज्यामुळे वातावरणात चैतन्य आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
या मंगलप्रसंगी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. एकनाथ महाराज गाडे यांच्या सुश्राव्य हरिकीर्तनाने झाली. त्यांच्या अमृतवाणीने उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला. कीर्तनानंतर महंत तुकाराम महाराज भारती यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास प्रारंभ झाला. या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ‘पेढेतुला’ करण्यात आली, जी त्यांच्याप्रति भाविकांच्या प्रेमाचे आणि आदराचे प्रतीक ठरली. यानंतर उपस्थित मान्यवर संतांच्या हस्ते महंत तुकाराम महाराज भारती यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याचवेळी महंत महादेवानंद भारती महाराज यांचाही सन्मान करण्यात आला.
बेलेश्वर संस्थानची महती महाराष्ट्रभर न्यावी – प्रकाश महाराज बोधले
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ह.भ.प. महंत प्रकाश महाराज बोधले म्हणाले, “बेलेश्वर संस्थान हे अध्यात्माचे सोनं आहे आणि हे सोनं सांभाळणाराच श्रेष्ठ असतो. महंत महादेवानंद भारती महाराजांनी ही परंपरा निष्ठेने जपली आहे. आता महंत तुकाराम महाराज भारती यांनी या संस्थानची महती आणि आध्यात्मिक वारसा संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सेवेतून मिळालेले पद हेच खरे रत्न – लक्ष्मण महाराज मेंगडे
ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “बेलेश्वर संस्थान हे सोन्याचे कोंदण असेल, तर त्यात महंत तुकाराम महाराज भारती यांच्यासारखे रत्न लाभले आहे. महाराजांनी प्रथम निष्ठेने संस्थानची सेवा केली, दिंडी सांभाळली आणि भाविकांना एकत्र आणण्याचे महान कार्य केले. अगोदर सेवा आणि त्यानंतर कारभार, हाच खरा वारकऱ्याचा धर्म आहे. त्यांच्या या वाटचालीत सर्व भाविक भक्तांनी सहकार्य करावे. महाराष्ट्रातील सर्व संतांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत.”
याप्रसंगी श्री महामंडलेश्वर १००८ स्वामी त्रिवेंद्रानंद सरस्वतीजी यांनी सांगितले की, “सेवाभावातूनच बेलेश्वर संस्थानचा विकास आणि महती वाढली आहे. निस्वार्थपणे परमार्थासाठी जीवन समर्पित करणारे महात्मे लाभल्याने या देवस्थानची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे.”
कार्यक्रमाला महंत महादेवानंद भारती, श्री ह.भ.प. महंत जनार्दन महाराज शिंदे, वैराग्यमूर्ती रामकृष्ण रंधवे बापू, महंत धर्मराज महाराज सामनगावकर, तालमार्तंड केशव महाराज जगदाळे गुरुजी, ह.भ.प. भक्तीदास महाराज शिंदे, भागवताचार्य प्रेमानंद महाराज नगरकर, ह.भ.प. नाना महाराज कदम, ह.भ.प. सुरेश महाराज जाधव, ह.भ.प. नवनाथ महाराज नाईकवाडे, ह.भ.प. अंगद महाराज सातपुते, आणि रणजीत महाराज शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नामांकित कीर्तनकार, गायक व वादक मंडळी उपस्थित होती.
सर्व संत-महंतांच्या आशीर्वादानंतर, नवनियुक्त सचिव महंत तुकाराम महाराज भारती यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. या भव्य सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. योगेश ठोसर यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील तरुण मंडळींनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील गावांचे सरपंच, प्रतिष्ठित नागरिक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.