बीड, २० जुलै (प्रतिनिधी) : अहिल्यानगर-बीड रेल्वेमार्गावरील चऱ्हाटा रोडवरील पालवण फाटा येथे सुमारे पावणे तीन कोटी रुपये खर्चून उभारलेला रेल्वेपूल लोहमार्ग आणि पुलाच्या दिशेचा अंदाज चुकल्याने पूर्णपणे निरुपयोगी ठरला आहे. हा पूल आता पाडण्याचे काम वेगाने सुरू झाले असून, या प्रक्रियेत जनतेच्या कष्टाच्या पैशातून शासनाकडे जमा झालेल्या निधीचा प्रचंड अपव्यय होत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले आहे. या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधित अभियंता आणि ठेकेदार कंपनीवर प्रशासकीय कारवाई करावी, तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई शासन तिजोरीत जमा करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, शेख युनुस, सुदाम तांदळे, रामनाथ खोड, शिवशर्मा शेलार, शेख मुस्ताक, शेख मुबीन, अशोक येडे, रामधन जमाले यांनी ५ फेब्रुवारी रोजीच केली होती. त्यावेळी त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. या मागणीची दखल घेत रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी “लवकरच कारवाई होईल” असे आश्वासन दिले होते.
मात्र, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनाला साडेपाच महिन्यांहून अधिक काळ उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट, आता हा निरुपयोगी ठरलेला पूल पाडण्याचे काम सुरू झाल्याने, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खासदार बजरंग सोनवणे व आमदार संदीप क्षीरसागर यांची चुप्पी

५ फेब्रुवारी रोजी खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी पालवण फाटा येथील या पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या होत्या. रेल्वे सुरक्षा आयुक्तांशी चर्चा करून या प्रकरणी कारवाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. मात्र, आजवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, “या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लोकप्रतिनिधींनी मूग गिळून गप्प राहणे निंदनीय आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली. जनतेच्या हितासाठी लोकप्रतिनिधींनी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.