बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

नगररोडवरील ‘यू-टर्न’बाबत तांत्रिक कारणे देणाऱ्या भोपळेंना ‘मोतिबिंदू’ झालाय का? – डॉ. गणेश ढवळे यांचा संतप्त सवाल

बीड, २१ जुलै (प्रतिनिधी): बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नगरनाका दरम्यानच्या रस्त्यावर ‘यू-टर्न’साठी दुभाजकात जागा सोडली नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय, तहसील कार्यालय, सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय आरोग्य प्रशिक्षण केंद्र, शासकीय विश्रामगृह, पंचायत समिती, चंपावती क्रीडा मंडळ यांसारखी अनेक महत्त्वाची कार्यालये आणि संस्था आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना नगरनाक्यापर्यंत जाऊन पावणेकिलोमीटरचा अनावश्यक फेरा मारावा लागत आहे.

‘यू-टर्न’च्या अभावामुळे वाढलेली गैरसोय

यापूर्वी या मार्गावर सहा ठिकाणी ‘यू-टर्न’ची सोय उपलब्ध होती, मात्र सध्या एकही ‘यू-टर्न’ ठेवण्यात आलेला नाही. या समस्येवर सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदने दिली, आंदोलने केली, तर लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक वृत्तपत्रांनीही वारंवार हा प्रश्न उपस्थित केला, तरी राज्य महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता राजेंद्र भोपळे यांनी “अपघात टाळण्यासाठी यू-टर्न नाही” असा युक्तिवाद करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चहाटा फाटा दरम्यान केवळ तीन ठिकाणी (नगरनाका, धानोरा रोड, कालिकानगर कमान) ‘यू-टर्न’ दिले आहेत. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयासमोर ‘यू-टर्न’ देण्यास “तांत्रिक अडचण” असल्याचे सांगून त्यांनी आपली असहमती दर्शवली आहे.

धुळे-सोलापूर महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या चिंताजनक

यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी अभियंता राजेंद्र भोपळे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “बीड शहरांतर्गत धुळे-सोलापूर महामार्गावरील दुभाजक नसल्याने होत असलेले अपघात त्यांना दिसत नाहीत का? त्यांना ‘मोतिबिंदू’ झालाय का?”

बीड शहरातून जाणारा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळणाद्वारे वळवण्यात आला असला तरी शहरातील १२ किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. हा रस्ता केवळ दोन लेनचा असल्याने वाहतुकीची सातत्याने कोंडी होते. दुभाजक नसल्यामुळे वाहने कोठूनही वळतात आणि अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

चौपदरीकरणाचे काम रखडल्याने समस्या अधिक तीव्र

या रस्त्याचे चौपदरीकरण मागील सहा वर्षांपासून रखडले आहे. दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम झाले असले तरी, रस्ता अरुंदच राहिला आहे. सध्या फक्त बसस्थानक ते महावितरण कार्यालय आणि बसस्थानक ते जिल्हा रेशीम कार्यालय या दरम्यानच दुभाजक आहेत; उर्वरित रस्त्यावर दुभाजक नाहीत. या मार्गावरून तासाभरात हजारो वाहने धावतात – ज्यात बस, खासगी गाड्या, दुचाकी, रिक्षा, आणि मालवाहू ट्रक यांचा समावेश आहे. पावसाळ्यात मातीमुळे वाहने घसरतात, तर राष्ट्रवादी भवन ते बार्शी रोडवर जागोजागी खड्डे पडले आहेत, ज्यामुळे अपघातांचा धोका आणखी वाढला आहे.

डॉ. ढवळे यांच्या प्रमुख मागण्या

या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

  • या मार्गावर तातडीने दुभाजक बसवावेत.
  • सिग्नल व्यवस्था सक्षम करावी.
  • आणि चौपदरीकरणाचे काम त्वरित सुरू करावे.

या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी आणि अपघातांचे प्रमाण कमी करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button