पंकजाताई मुंडे यांचा भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांना कानमंत्र
नियोजबध्द प्रचार यंत्रणा राबविण्यावर परळीतील कार्यशाळेत दिला भर
परळी:आठवडा विशेष टीम― राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी परळीची निवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकण्यासाठी मतदारसंघातील बुथ कार्यकर्त्यांना आज कानमंत्र दिला. नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना कार्यशाळेत धडे दिले. दरम्यान, ना. पंकजाताई मुंडे येत्या ३ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे मोठे शक्ती प्रदर्शन यावेळी होणार आहे.
परळी मतदारसंघातील बुथ प्रमुख व विविध समित्यांच्या प्रमुखांची कार्यशाळा आज शहरातील अक्षता मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना ना. पंकजाताई मुंडे यांनी मतदारांशी डोअर टू डोअर संपर्क, मतदानाची तयारी, प्रचाराचे नियोजन आदींबाबत मार्गदर्शन केले. मी थेट बुथप्रमुखांच्या संपर्कात राहणार आहे, कुणाच्या धमक्यांना घाबरू नका, कसलीही काळजी करू नका, तुमची सुरक्षा करेल अशा शब्दांत आधार दिला. या निवडणुकीने आपल्याला विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी मिळाली आहे म्हणून प्रत्येकाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन केलेल्या कामांची सर्वाना माहिती देऊन मताधिक्य वाढविण्याची स्पर्धा करावी असे आवाहन त्यांनी केले.
विरोधक बिथरले ; त्यांचा स्वतःवरचा विश्वासही उडाला
ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा समाचार घेतला. निवडणूकीत राष्ट्रवादीचे लोक कोणत्याही थराला जातील, सध्या ते बिथरले आहेत, त्यांचा स्वतःवरचा देखील विश्वास उडाला आहे. एकेक करत त्यांचे नेते आपल्याकडे येत आहेत, त्यांचा पक्ष जिल्हयातच नव्हे तर राज्यातही राहिला नाही, म्हणून ते भर सभेत स्वपक्षियांनांच धमक्या देत आहेत. ज्यांचा स्वतःच्या कार्यकर्त्यांवरच विश्वास नाही ते जनतेचा कसा विश्वास सार्थ करतील असा सवाल त्यांनी केला.
खोटे बोल पण रेटून बोल अशांपासुन सावध रहा – खा. डॉ. प्रितमताई मुंडे
यावेळी मार्गदर्शन करताना खा. डॉ. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की, आपल्या कार्यकर्त्यांनी आता आक्रमक भूमिका घ्यावी. खोटे बोल पण रेटून बोल अशा लोकांपासून जनतेला सावध करावे. ना. पंकजाताई मुंडे यांनी मतदारसंघात विकासाची गंगा आणली आहे. आपण केलेली कामे जनतेला सांगा. विरोधक हे खोटे बोलणारे आहेत ना. पंकजाताई यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. आपण जनतेला खरी परिस्थिती सांगा असे सांगून ना. पंकजाताई यांच्या विजयाचे आपण सर्वजण शिलेदार होऊ अशी साद कार्यकर्त्यांना घातली. ना. पंकजाताई म्हणजे चमत्कार अशी ओळख निर्माण झाली आहे. मास्टर स्ट्रोक मारण्याची कला आणि ताकद त्यांच्यात आहे आपण त्यांना बळ देण्याचे काम करू. आपल्याकडे निष्ठावंतांची फौज आहे तर त्यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांना धमक्या द्याव्या लागत आहेत असा टोला हाणून ना. पंकजाताई मुंडे यांना ऐतिहासिक मताधिक्य मिळवण्यासाठी सर्वांनी प्राणपणाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादीला भगदाड
यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मिरवट सेवा सोसायटीचे चेअरमन भरत इंगळे, कौडगाव साबळाचे माजी सरपंच उत्तमराव बोडखे, नागनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांसह तसेच संभाजी ब्रिगेड पिंपरीचे अध्यक्ष किशोर भोसले आदींनी भाजपात प्रवेश केला सर्वांचे ना. पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले.
भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा ईटके, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, विकासराव डुबे, श्रीहरी मुंडे, युवानेते श्रीराम मुंडे, जीवराज ढाकणे, बाबुराव मेनकुदळे, डॉ. शालिनीताई कराड,राजेश गीते, सुधाकर पौळ, भिमराव मुंडे, वैजनाथ जगतकर, शेख अब्दुल करीम, प्रा. बिभीषण फड, प्रा. पवन मुंडे, दत्तात्रय देशमुख, गंगाधर रोडे, बळीराम गडदे, वहाजोद्दीन मुल्ला, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व बुथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि कांदे यांनी तर आभार प्रदर्शन उमेश खाडे यांनी केले.
••••