धनंजय मुंडेंनी अंबाजोगाईच्या स्वारातीला MRI मशीन मिळवून दिली

अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली

अंबाजोगाई दि.१८:आठवडा विशेष टीम बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आढावा बैठक घेऊन अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या एम आर आय मशीन साठी हाफकीन जीव – औषध निर्माण महामंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याचा सूचना केल्या होत्या. त्या प्रस्तावास महामंडळाकडून तात्काळ मान्यता प्राप्त करून देत साडेनऊ कोटी रुपयांची एम आर आय मशीन ना. मुंडे यांनी मंजूर करून दिली आहे.

याबाबत ना. मुंडे यांनी हाफकीनचे राजेश देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करत चर्चा केली होती. त्यानुसार हाफकीनने आता 9 कोटी 52 लक्ष रुपये किमतीचे एम आर आय मशीन खरेदी करण्यासंदर्भात निविदा प्रसिद्ध केली आहे.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे जिल्हावासीयांच्या आरोग्याप्रति कमालीचे सतर्क असून त्यांनी दोन दिवसांपूर्वी येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात आढावा बैठक घेतली होती. यावेळी 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एम आर आय मशीनच्या मागणीसंदर्भात चर्चा झाली होती.

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे व महत्वाचे रुग्णालय मानले जाते, मात्र स्थापनेपासून आजपर्यंत याठिकाणी एम आर आय मशीन नव्हती.

एम आर आय मशीन स्पाईनचे आजार, डोक्याचे, छातीचे आजार, गाठी, पोटातले आजार, सिटी स्कॅन मध्ये उघड न होणारे आजार अशा अनेक मध्यम व गंभीर आजारांसाठी अनेक अर्थांनी उपयुक्त व अत्यंत आवश्यक उपकरण आहे.

ही मशीन उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना या तपासण्या करण्यासाठी लातूर, औरंगाबाद, नांदेड अशा मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत असे, तसेच त्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत असत. गेल्या 15 वर्षांपासून एम आर आय मशीनची मागणी करण्यात येत होती. पालकमंत्री ना. मुंडे यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे आता हा आटापिटा व खर्च लवकरच थांबणार आहे.

दोनच दिवसांपूर्वी ना. मुंडे यांनी बैठकीतून हाफकीनचे श्री. राजेश देशमुख यांच्याशी चर्चा करून मशीन खरेदी संदर्भात निविदा सादर करणेबाबत स्वाराती प्रशासनास सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्वारातीचे अधिष्ठाते डॉ. सुधीर देशमुख यांनी एकच दिवसात प्रस्ताव सादर करून हाफकीनला सादर केला व आज (दि.१८) हाफकीनच्या वतीने सदर प्रस्ताव मंजूर करून एम आर आय मशीन खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली.

सदर एम आर आय मशीन खरेदी साठी हाफकीन महामंडळाने नऊ कोटी 52 लाख रुपयांच्या खरेदी निविदा 08 जूनच्या आत मागवल्या असून 11 जूनला या निविदा उघडण्यात येतील. साधारण जून अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात एम आर आय मशीन स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रुग्णसेवेसाठी उपलब्ध असले असे स्वाराती चे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख म्हणाले.

सदर रुग्णालय स्थापन केल्यापासून न मिळालेले उपकरण, 15 वर्षांपासून मागणी करूनही मिळाले नाही, मात्र ना. मुंडे यांनी अवघ्या दोन दिवसात ते मिळवून दिले यासाठी रुग्णालय प्रशासनाने ना. मुंडे यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button