‘कायाकल्प’ मधुन ग्रामिण रूग्णांना मिळतोय दिलासा
आठवडा विशेष|प्रतिनिधी
अंबाजोगाई दि.१५: तालुक्यातील ग्रामिण रूग्णालय धानोरा (बु.) यांनी शासनाच्या कायाकल्प उपक्रमात सहभाग घेतला.खासगी रूग्णालयाप्रमाणे शासकीय रूग्णालयात दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी ग्रामिण रूग्णालय धानोरा (बु.) चे डॉक्टर, कर्मचारी यांनी स्वतः पुढाकार घेत स्वतःचे 6 दिवसाचे मानधन देवून श्रमदानाच्या माध्यमातून लोकसहभागातून रूग्णालयाचा चेहरा मोहरा बदलला आहे. साडेपाच एकर परिसरात असलेले ग्रामिण रूग्णालय धानोरा (बु.) येथे सुशोभिकरण,उद्यान निर्मिती,आयुर्वेदीक वनस्पतीची लागवड करून रूग्णालयाच्या प्रत्येक वॉर्डात दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविल्या आहेत.यामुळे पंचक्रोषीतील सुमारे 14 गावांना आता या रूग्णालयामुळे दिलासा मिळाला आहे.
ग्रामिण रूग्णालय धानोरा (बु.) यांच्या वतीने शहरातील हॉटेल कृष्णाई हॉल येथे गुरूवार,दि.14 फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना वैद्यकीय अधिक्षक डॉ.रणजीत जाधव यांनी सांगितले की, ‘कायाकल्प’ हा उपक्रम शासनाचे एक उद्दिष्ठ आहे.तसेच ती स्पर्धा ही आहे. खासगी रूग्णालयाप्रमाणे शासकीय रूग्णालयात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सोयी सुविधा मिळाव्यात, स्वच्छतेबाबत जागृकता निर्माण व्हावी, रूग्णांबरोबरचा संवाद चांगला असावा यासाठी हा ‘कायाकल्प’ उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गंत ग्रामिण रूग्णालय धानोरा (बु.) रूग्णालयाच्या साडेपाच एकर परिसरात डॉक्टरांनी,नर्स,कर्मचारी,परिसरातील दानशुर व्यक्ती,मानवलोक सेवाभावी संस्थचे अनिकेत लोहिया, डॉ.चंद्रकांत चव्हाण,डॉ. राजकुमार गवळे,
मेडीकल असोशिएशन अंबाजोगाई,नवजीवन व्यसनमुक्ती उपचार केंद्र यासह अनेक दात्यांनी पुढे येत मदतीचा हात दिला व श्रमदानातून तसेच स्वतःचा सहा दिवसांचा पगार रूग्णालयाच्याय डॉक्टर व कर्मचार्यांनी स्वखुशीने उपलब्ध करून दिला.यानुसार रूग्णालयात उद्यान तयार करणे, इमारतीला रंगकाम करणे यासह आवश्यक यंत्रसामुग्री, लोकसहभागातून उभी करणे ही कामे करण्यात आली आहेत.धानोरा (बु.) गावचे सरपंच यांनी 50 हजार रूपयांची औषधे व स्वतः 25 हजार रूपये दिले आहेत. अंबाजोगाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी रूग्णालयातर्गंत येणार्या 14 ग्रामपंचायतींना रूग्णालयास सर्वोतोपरी सहकार्य करण्याबाबत आवाहन केले त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.या माध्यमातून ग्रामिण रूग्णालय धानोरा (बु.) परिसरातील खड्डे बुजवणे, परिसर स्वच्छता,वृक्षारोपण, आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती होण्यासाठी डिजीटल फलक, प्रचार साहित्य तसेच अद्यायावत ऑपरेशन थिअटर, प्रसुती कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. याचा फायदा ग्रामिण रूग्णांना होत आहे. सुरूवातरीला दररोज 60 ते 70 रूग्ण तपासणीला येत असत हा आकडा वाढून आता 200 ते 250 इथपर्यंत पोहोंचला आहे.या रूग्णालयात 40 जणांचा कर्मचारी वर्ग असून तो ग्रामिण रूग्णांना दर्जेदार रूग्ण सेवा देत आहे. अशी माहिती डॉ.रणजित जाधव यांनी दिली.तर यावेळी पॉवरपाईंट प्रेझेेंटेशन द्वारे डॉ.महेंद्र लोमटे यांनी ‘कायाकल्प’ उपक्रमासाठी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात व डॉ.आर.एस.जाधव यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत असल्याचे सांगितले. लोकसहभागातून काय होवू शकते. हा चमत्कार पहावयास मिळतो अशी माहिती त्यांनी दिली. बाह्य स्वरूपासोबतच दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी ‘कायाकल्प’ उपक्रम उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.या उपक्रमामुळे विविध शस्त्रक्रिया,तपासण्या व मोफत रक्ततपासण्या आदींची सोय उपलब्ध झाली आहे.कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये वाढ झाल्याची माहिती डॉ.महेंद्र लोमटे यांनी दिली.प्रारंभी पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक डॉ.राजकुमार गवळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत सांगळे यांनी मानले.यावेळी ग्रामिण रूग्णालय धानोरा (बु.) चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.रणजीत जाधव,वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत सांगळे,डॉ.महेंद्र लोमटे, डॉ.के.डी.साखरे, डॉ.पी.एस.देशमुख,डॉ. राजकुमार गवळे,तंत्रज्ञ संजय गिराम,कर्मचारी के.बी.चौरे आदींची यावेळी उपस्थिती होती.
