केंद्र सरकारने गरजू कुटुंबांना १० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी ; मजुरांना परराज्यात पाठवण्याची व्यवस्था करावी―राजकिशोर मोदी
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― राज्यासह बीड जिल्ह्यातील मजूर,श्रमिक,गरजू,गरीब कुटुंबांना केंद्र सरकारने तात्काळ 10 हजार रूपये आर्थिक स्वरूपात मदत करावी.तसेच पुढील सहा महिन्यांसाठी महिना प्रत्येकी 7500/- रुपये द्यावेत.यासोबतच केंद्र सरकारने संपूर्ण खर्च करून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली आहे.याबाबत गुरूवार,दिनांक 28 मे रोजी
व्हाट्सअप,फेसबूक,इंस्टाग्राम,ट्विटर या माध्यमातून काँग्रेस पक्ष केंद्र सरकारला जाब विचारणार आहे.
याबाबत माहिती देताना राजकिशोर मोदी म्हणाले की,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने लॉकडाऊनच्या माध्यमातून कष्टकरी,श्रमिक आणि मजूर वर्गाला वेठीस धरले आहे.ज्यावेळेस देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता.त्यावेळेस माञ परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी कोणतीही सुविधा तसेच व्यवस्था केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली नाही.परंतु,राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हजारोंच्या संख्येने वाढताच अचानक केंद्र सरकारने परप्रांतीय मजूर वर्गाला त्यांच्या राज्यात जाण्यासाठीच्या सूचना जारी केल्या.हे करताना केंद्र सरकारने पुरेशा रेल्वे,बस व वाहतुकीची इतर साधने उपलब्ध करून दिली नाहीत.त्यामुळे अनेक मजूर नागरिक राज्यातील अनेक जिल्ह्यांत आज ही मोठ्या संख्येने अडकून पडले आहेत.यासोबतच दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन असल्याने राज्यातील मजूर,श्रमिक, शेतकरी,व्यापारी हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत.त्यांच्या उपजीविकेची कोणतीही साधने नसल्याने केंद्र सरकारने मजूर व गरजू गरीब कुटुंबांना तात्काळ 10 हजार रुपये आर्थिक मदत करावी.तसेच पुढील सहा महिन्यांसाठी प्रति महिना साडेसात हजार रूपये द्यावेत.परप्रांतीय मजूर व नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने स्वतःच्या निधीतून आर्थिक तरतूद व खर्च करून त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करावी या मुख्य प्रश्नाकडे लक्ष वेधत देश राज्य व जिल्हा पातळीवर काँग्रेस पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज गुरूवार,दिनांक 28 मे रोजी सोशल मिडियाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे.याबाबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवार,दिनांक 27 मे रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि सर्व जिल्हाध्यक्ष अशा 205 पदाधिका-यांसह ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,खा.राजीवजी सातव,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींनी आपल्याशी संवाद साधल्याची माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने कायद्याचे पालन करून आज गुरूवार,दिनांक 28 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व्हाट्सअप,फेसबूक,इंस्टाग्राम,ट्विटर या माध्यमातून डिजीटल व सोशल साधने व सुविधा वापरून जनजागृती करून याप्रश्नी काँग्रेस पक्ष केंद्र सरकारला जाब विचारणार आहे.घरी बसूनच हे आंदोलन करायचे आहे.तरी बीड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी,नेते,सर्व जिल्हा पदाधिकारी,तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष,पदाधिकारी,विविध सेलचे जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष,प्रमुख,नेते व कार्यकर्त्यांनी,सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांचेसह जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.
