मुंबई दि.१: लोकसभेची राज्यातील मतदान प्रक्रिया संपली तोपर्यंतच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक थक्क करणार विधान केलेलं आहे. ‘बारामतीची लोकसभेची जागा जिंकण्याचा भाजपा सातत्याने दावा करत आहे. ईव्हीएम छेडछाडीच्या आधारे तर भाजपाकडून असा दावा करण्यात येत नाही ना?’ अशी शंका राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपाने मोठी ताकद लावलेली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर बारामती शहरात अनेक दिवस तळ ठोकून होते. त्यामुळे ही जागा जिंकण्याचा दावा भाजपाकडून वारंवार करण्यात येत आहे. तसेच माढ्यातून तुम्ही उभा राहू नका, असा सल्लाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांना दिला होता.
याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘देशभरात ईव्हीएमबाबत अनेकवेळा शंका व्यक्त करण्यात आल्या आहेत. कधी निवडणूक न लढवणारे चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते इतक्या आत्मविश्वासाने बारामतीची जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. हा दावा ईव्हीएमच्या जोरावर तर केला जात नाही ना?’