बीड, १३ जुलै (लिंबागणेश प्रतिनिधी): बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे एका मोठ्या चोरीच्या घटनेने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. अहमदपूर ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ‘शिवम मशिनरी अँड इलेक्ट्रिकल्स’ या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी तब्बल साडेपाच ते सहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली असून, गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीराम पाठक यांच्या मालकीचे शिवम मशिनरी अँड इलेक्ट्रिकल्स हे दुकान लिंबागणेश गावातील वर्दळीच्या ठिकाणी आहे. पाठक हे बुधवारी गेवराई येथे आपल्या नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी गेले असल्याने त्यांचे दुकान दिवसभर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
गुरुवारी सकाळी, शेजारील व्यावसायिक अशोक वायभट यांना दुकानाचे शटर तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी तात्काळ फोन करून याची माहिती दुकान मालक श्रीराम पाठक यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पाठक यांनी तातडीने दुकानाकडे धाव घेतली. आत प्रवेश केला असता त्यांना मोठा धक्का बसला. दुकानातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि वायंडिंग वायर, स्क्रॅप मटेरियलसह इतर मौल्यवान वस्तू गायब होत्या. चोरट्यांनी दुकानातील गल्ला फोडून त्यातील सुमारे पाच ते सहा हजार रुपयांची रोकडही चोरून नेली. या सर्व चोरी झालेल्या मालाची एकूण अंदाजित किंमत साडेपाच ते सहा लाख रुपये असल्याचे पाठक यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब रोकडे, पोलीस हवालदार विशाल क्षीरसागर तसेच लिंबागणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब राख आणि गोविंद बडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व रीतसर पंचनामा केला.

सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.