पाटोदा, १६ जुलै (गणेश शेवाळे): पाटोदा शहराच्या विकासाचा डंका पिटणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाचा ढिसाळ आणि असंवेदनशील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील मुस्लिम कब्रस्तानामध्ये मूलभूत सुविधांचा, विशेषतः प्रकाशाच्या सोयीचा ( पथदिवे ) अभाव असल्याने संपूर्ण मुस्लिम समाज बांधवांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना येणाऱ्या अडचणींमुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून, प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षाविरोधात आवाज उठवला जात आहे.
प्रशासकीय अनास्थेचा कळस: पाटोदा येथील मुस्लिम कब्रस्तानातील अंधारामुळे समाज बांधव संतप्त
मागील अनेक महिन्यांपासून कब्रस्तानातील पथदिवे बंद अवस्थेत आहेत किंवा अनेक ठिकाणी ते बसवण्यातच आलेले नाहीत. यामुळे रात्रीच्या वेळी दफनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अंधारामुळे मार्गाचा अंदाज येत नाही, ज्यामुळे वृद्ध आणि महिलांना चालताना त्रास होतो. अनेकदा तर मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात दफनविधी करण्याची वेळ येत असल्याचे विदारक चित्र येथे पाहायला मिळते. कब्रस्तान हे एक पवित्र स्थळ मानले जाते, मात्र येथील अंधार आणि अस्वच्छतेमुळे या पवित्र स्थळाची अवहेलना होत असल्याची भावना समाज बांधवांकडून व्यक्त होत आहे.
एका स्थानिक ज्येष्ठ नागरिकाने आपली व्यथा मांडताना सांगितले की, “आमच्यासाठी कब्रस्तान हे अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे. रात्री-अपरात्री कोणाचा मृत्यू झाल्यास आम्हाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अंधारामुळे दफनविधीसाठी जागा शोधण्यापासून ते विधी पूर्ण करेपर्यंत प्रत्येक पावलावर अडथळा येतो. आम्ही या समस्येबाबत अनेकदा नगरपंचायत प्रशासनाकडे तोंडी आणि लेखी तक्रारी केल्या, मात्र आश्वासनांपलीकडे काहीही मिळालेले नाही.”
या गंभीर समस्येकडे पाटोदा नगरपंचायत प्रशासनाने केवळ दुर्लक्षच केले नाही, तर नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली असल्याचा थेट आरोप आता केला जात आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे मुस्लिम समाजात असंतोष खदखदत आहे. नगरपंचायतीने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून कब्रस्तानमध्ये कायमस्वरूपी आणि पुरेशी प्रकाशाची सोय करावी, अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे. जर प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मुस्लिम समाजाने दिला आहे.
