प्रशासकीयब्रेकिंग न्युज

‘महाराष्ट्र भूषण’ शिल्पकार ‘राम सुतार’ !

आठवडा विशेष टीम―

भारताचा कला व सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्राचं नाव विविध क्षेत्रात मोठ करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत मुळचे धुळ्याचे व सध्या दिल्लीलगत नोएडा शहरात वास्तव्यास असणारे जागतिक किर्तीचे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हे नाव अढळ ताऱ्याप्रमाणे आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषित केला. त्यांचे नाव अगोदरच गुजरातमधील केवडिया कॉलनीतील लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीया शिल्पांमुळे आंतरराष्ट्रीयर पातळीवर चर्चीले जात आहे. नेहमीच देश आणि विदेशातील शिल्पकलेच्या क्षेत्रात आचाट प्रयोग करणारे पद्मभूषण राम सुतार यांचा धुळे ते दिल्ली पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.

देश-विदेशातून भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला अर्थात संसदेला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरीकास सुतार यांच्या कामाचे सर्वांग सुंदर व सर्वोत्तम स्वरूप पहायला मिळते ते त्यांच्या कलाकृतीमधून. संसदेच्या आवारात उभारलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देशाला मार्गदर्शक ठरणाऱ्या महान व्यक्तीमत्त्वांचे १६ पुतळे सुतार या मराठी शिल्पकाराने साकारले आहेत. सरासरी १६ ते १८ फुटांच्या धातूनिर्मित या पुतळ्यांनी लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला वेगळी उंची प्रदान केली आहे. राम सुतार यांच्या शिल्पकलेतील उंचीचा हा अल्प परिचय मिळाल्यानंतर आपणास निश्चितच उत्सुकता लागली असेल या कलावंताचे महाराष्ट्रातील मूळ गांव व त्यांचा शिल्पकलेतील प्रवास जाणून घेण्याचा. वाचकांच्या मनातला नेमका हाच प्रश्न त्यांना विचारला तेव्हा ते भावूक झाले.

धुळे शहरापासून २ ते ३ मैलावर असणाऱ्या गोंदूर या गावचा माझा जन्म. वडील वंजीहंसराज सुतार हे व्यवसायाने सुतार असल्याने कलेचा संस्कार घरातूनच आला. शेतीसाठी लागणारी अवजारे, बैलगाडी आदी वस्तू माझे वडील खूपच आखिव रेखीव पद्धतीने तयार करीत असत. त्यातूनच मला चित्र रेखाटण्याची व शिल्प साकारण्याची आवड निर्माण झाली हे सांगताना सुतार आपल्या शालेय दिवसांमधे रमल्याचा भास होत होता. शालेय जीवनात शिक्षकांनी माझ्यातील कलाकार ओळखून दिलेल्या प्रोत्साहनामुळे माझ्यातील कलाकाराची पायाभरणी झाली. गावात चौथी पर्यंत शाळा. पुढे पाचवी शिकायला म्हणून निमजाळे या गावातील शाळेत प्रवेश घेतला. सहा फूट उंचीच्या पहीलवानाचा सिमेंटचा पुतळा साकारून १९४७ मधे सुतार यांनी आयुष्यात पहिले शिल्प तयार केले. १९२५ मधे जन्मलेल्या राम सुतार यांनी आजतागायत शेकडो शिल्प तयार केली असून जगातील जवळपास ८० देशात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी यांच्या शिल्पासह २५० शिल्पांचा यात समावेश आहे…

पुढे धुळ्यातील शिक्षक प्रशिक्षण संस्थेत सुतार जाऊ लागले. इथेच त्यांनी चित्रकलेच्या प्राथमिक परिक्षाही उत्तीर्ण केल्या. त्यांच्या उत्तम कामामुळे इथेच त्यांना चित्रकलेतून पैसेही मिळू लागले. शिक्षक प्रशिक्षण केंद्रात शिक्षकांना मॉडेल व चित्र तयार करून देण्याच्या मोबदल्यात त्यांना प्रती वस्तू पाच रूपये मिळकत मिळू लागली. आता सुतार यांना कामातही आंनद वाटू लागला. १९४८ साली शिक्षक प्रशिक्षण केंद्रातील शिक्षक श्रीरामकृष्ण जोशी यांच्याकडून महात्मा गांधी यांचे सिमेंटचे शिल्प तयार करण्याची ऑर्डर मिळाली. त्यांनी महात्मा गांधीचे चार फुटांचे सिमेंटचे शिल्प तयार केले. मोबदल्यात त्यांना १०० रूपये मिळाले. ही शिल्पातून मिळालेली त्यांची पहिली कमाई. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या व्यक्तीमत्त्वाचा मोठा प्रभाव आहे. सुतार जेमतेम दुसरीत असतानाच गांधीजींनी त्यांच्या गावाला भेट दिल्याची घटना आजही त्यांना स्मरते. परदेशी कापडांच्या होळीत सक्रीय सहभाग घेत सुतार यांनी त्यावेळी आपल्या डोक्यातील गोल मखमलीची टोपी या होळीत टाकल्याचे ते सांगतात. पुढे महात्मा गांधींचे शिल्प उभारण्याची संधीच त्यांना मोठ्या प्रमाणात मिळत गेली. सुतार यांच्या कलात्मक हातातून गुजारतमधील गांधीनगर येथे सचिवालयात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधीजींच्या अलौकीक शिल्पासाठीच त्यांना पद्मश्री या मानाच्या नागरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

रामकृष्ण जोशी यांच्या मदतीने राम सुतार मुंबईला गेले व माटुंग्यात राहू लागले. १९४९ मधे त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधे प्रवेश घेतला. शैक्षणिक योग्यतेमुळे त्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळाला व त्यांनी चार वर्षातच शिक्षण पूर्ण केले. इथेही त्यांनी चारही वर्ष प्रथम येण्याचा मान मिळवत मेयो पदक पटकाविले.

यानंतर त्यांनी जे.जे. म्हात्रे आणि करमरकर या तत्कालीन प्रसिद्ध शिल्पकारांसोबत काम केले. याच काळात केंद्रीय लोकसेवा आयोगाने वेरूळ व अंजिठा या जगप्रसिद्ध लेण्यांच्या देखभालीसाठी आर्टीस्टची परीक्षा घेतली. ही परीक्षा उत्तीर्ण करून सुतार यांनी १९५४ ते १९५८ या कालावधीत या लेण्यांतील मुर्त्यांच्या डागडूजीचे काम यशस्वीपणे केले. १९५९ मध्ये त्यांनी दिल्लीस्थित केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत जाहीरात व दृष्य प्रचार संचालनालयाची (डीएव्हीपी) नोकरी स्वीकारली आणि तेव्हापासूनच ते दिल्लीत स्थायिक झाले. दिल्लीतील प्रगती मैदानावरील कृषी प्रदर्शनात सुतार यांनी उभारलेला शेतकऱ्याचा पुतळा अधिकाऱ्यांना फारच आवडला व त्यांनी लगेच सुतारांची भेट घेऊन त्यांना दोन शेतकरी जोडप्याचे दोन पुतळे बनविण्याची ऑर्डर दिली. त्यांनी शेतकरी महिला व पुरूष असे प्रत्येकी १३ फुटाचे दोन पुतळे तयार केले त्याचा मोबदला म्हणून सुतार यांना १५ हजार रुपये मिळाले. हा क्षणच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. सरकारी नोकरीत राहून तूम्ही हे काम करू शकत नाही असे त्यांच्या डीएव्हीपीतील अधिकाऱ्याने सांगितले. सुतार यांनाही आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कला दाखविण्यासाठी स्वतंत्र काम करण्याची निकड भासू लागल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

याच काळात तत्कालीन केंद्रीय लोकनिर्माण विभागाचे मुख्य वास्तुविशारद जोगडेकर यांना सुतार यांच्या कामाविषयी कळताच त्यांनी सुतार यांना बोलावून घेतले. केंद्र सरकातर्फे पाच फुटांचे अशोकस्तंभ उभारण्याचे काम त्यांनी सुतार यांना सोपवले. खूप अशोकस्तंभ उभारायचे होते. पण हा प्रकल्प लवकरच बंद झाला. त्यातच त्यांना भोपाळला बोलवणे आले. मध्यप्रदेश सरकारने मध्यप्रदेश व राजस्थानमधून वाहणाऱ्या चंबळ नदीवर गांधीसागर धरण बांधायला सुरुवात केली होती. या धरणासाठी दहा हजार रूपयांमधे चंबळदेवीचे ४५ फूट उंचीचे शिल्प काँक्रीटमध्ये कोरण्याचे काम त्यांनी स्वीकारले. चंबळदेवी आणि तिला कवटाळणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन मुलांच्या बंधुत्वभाव व्यक्त करणारे अप्रतिम शिल्प १८ महिन्यात तयार झाले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा बघून प्रभावित झालेल्या पंडित नेहरूंनी सुतारांना पंजाबमधील भाक्रा धरणावर श्रमिकांची शिल्पकृती उभारण्याचा मनोदय बोलून दाखवला पण दुर्दैवाने ही शिल्पकृती पूर्ण होऊ शकली नाही आणि त्याच ठिकाणी सुतारांनी पंडित नेहरूंचा १८ फुट उंचीचा पुतळा उभारला. यानंतर संसदेच्या आवारात उभारण्यात आलेले महापुरूषांचे १६ पुतळे आणि महात्मा गांधीच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विदेशात महात्मा गांधीचे पुतळे उभरण्याचे काम करीत जवळपास ८० देशांमधे गांधीसह इतर ३५० पुतळे उभारण्याची किमया या मराठी अवलीया शिल्पकाराने केली आहे.

गुजरातमध्ये बसविण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचेही ते आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांनी काम केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याबाबत सांगायचे झाले तर त्या पुतळ्याची प्रत्यक्ष उंची ५२२ फूट आहे. सरदारांच्या पुतळ्याची उंची नदीपात्रापासून ६०७ फूट (१८2 मीटर) आहे. एकात्मतेचे स्मारक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) म्हणून नामाभिधान केलेला सरदारांचा पुतळा सरदार सरोवर धरणाजवळील साधू बेटावर उभा केला आहे.

अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलचे प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटरचा पुतळा ही तिन्ही शिल्पे राम सुतार यांच्या कल्पनेतूनच साकारत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा २०१६ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला. एक कोटी रुपये, प्रमाणपत्र आणि पारंपारिक हस्तकला शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आता महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान होणार आहे.

सुतार यांच्या कलेचा वारसा त्यांचे एकुलते एक चिरंजीव अनिल सुतार सांभाळत आहेत. अनिल सुतार यांना लहानपणापासूनच वडिलांच्या शिल्पकलेने प्रचंड वेड लावले. मुलाची शिल्पकलेतील गती पाहता सुतार यांनी अनिल यांना शिल्पकलेच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. दिल्लीतच पदवी शिक्षण पूर्ण करून अनिल यांनी अमेरिकेतून शिल्पकलेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पाटण्यात महात्मा गांधीचा पुर्णाकृती पुतळा आणि कोलकाता येथील सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात अनिल यांनी वडीलांसोबत सहायक शिल्पकाराची भूमिका बजावली आहे. अनिल यांनी आपल्या वडीलांना गुरूदक्षिणेच्या स्वरूपात त्यांच्या शिल्पकेलेतील प्रवासावर आधारीत दोन पुस्तकके प्रकाशित केली आहेत. मुलाच्या शिल्पकलेतील गतीबाबत सुतार संतुष्ट आहेत. या वयातही शिल्पकलेच्या माध्यमातून मातीशी संवाद साधण्याची सुतार यांची साधना अखंडपणे सुरु आहे. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीला भोवऱ्याची उपमा देताना सुतार म्हणतात, ‘भोवऱ्याला जसजशी उतरण मिळेल तसतसा तो फिरत जातो,  तसे माझ्या बाबतीत घडले आहे’. त्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी नितांत प्रेम आहे. मनात खोलवर बिंबलेले गोंदूर (ता.धुळे) गावच्या मातीतले संस्कार घेऊनच शिल्पकलेतील हा सर्वप्रवास असल्याचे भाष्य करणाऱ्या आभाळभर किर्तीच्या पद्मविभूषण राम सुतार यांच्या कार्याला मानाचा मुजरा.

०००

रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button