सोयगाव दि.२६(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):निवडणुका होताच सोयगाव पंचायत समिती कार्यालयाला पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलच्या अंतिम कामांचे फलक शुक्रवारी प्राप्त झाले असून अद्याप मात्र निधीच मागे असल्याने योजनेतून घरकुल पूर्ण झाल्याच्या फलकांनीच गर्दी केल्याने लाभार्थी मात्र कोड्यात पडले आहे.
पंतप्रधान आवास योजनेसाठी सोयगाव तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आले सर्वेक्षणाचा अहवाल नमूद कालावधीत सादर करण्यात आला,परंतु मध्येच निवडणुकांची आचारसंहिता आणि गटविकास अधिकाऱ्यांची आदलाबदली यामुळे या योजनेचा निधी जिल्हा प्रशासन आणि निवडणुकांच्या गोतावळ्यात अडकला आहे.या योजनेचे प्रवर्गनिहाय सोयगाव तालुक्यात मोठी लाभार्थी संख्या असून,सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या पक्षांनी लोकसभा निवडणुकांमध्ये या योजनेचा मुद्दा करून प्रचार यंत्रणा राबिवली,परंतु निधी आधीच सोयगावला केवळ फलक आल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे संबंधित विभागात याबाबत विचारणा केली असता,गटविकास अधिकारीच याबाबत सखोल माहिती देतील असे समर्पक उत्तर मिळाले.दरम्यान निवडणुकांच्या कचाट्यात सोयगाव तालुक्यातील विविध योजनांचा निधी अडकला असतांना सोयगाव पंचायत समितीच्या संबंधिताकडून मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने लाभार्थ्यांना कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे,ऐन उन्हाचा कडाका,दुष्काळाची दाहकता यामुळे लाभार्थ्यांना सध्या लाभाची गरज आहे.परंतु सोयगावला सर्वच शासकीय योजना केवळ शोभेच्या वस्तू बनल्या असून याकडे जिल्हा पातळीवरूनही दुर्लक्ष केल्या जात आहे.