Offer

राज्यात राष्ट्रपती राजवट, शेतकरी वाऱ्यावर ; माहिती विभागाची टूर निघाली इस्रायलला―धनंजय मुंडेंनी घेतली हरकत!

मुंबई दि.१४:आठवडा विशेष टीम―राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर असून सततचा दुष्काळ व त्यानंतर आता अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच माहिती व जनसंपर्क खात्यातील अधिकाऱ्यांचा परदेश दौरा व त्यावर होणारी उधळपट्टी यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार धनंजय मुंडे यांनी हरकत घेतली आहे. मुंडे यांनी हा दौरा रद्द करावा अशी मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे.

एकीकडे सत्ता स्थापनेचा गुंता वाढल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यात अगोदरच राज्यभरात शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक ओल्या दुष्काळाने गेले आहे. या अस्थिर परिस्थितीत अगोदरच डबघाईला आलेल्या माहिती व जनसंपर्क विभागातील 2 संचालक व 5 वरिष्ठ अधिकारी अभ्यास दौऱ्याचे कारण देत इस्रायल दौऱ्यावर निघाले असून या अधिकाऱ्यांपैकी काही जणांवर न्यायालयात प्रलंबित खटले आहेत तर काही जण परिविक्षाधीन कालावधीत सेवेत आहेत.

राज्यात माहिती व जनसंपर्क हा विभाग नेहमी मुख्यमंत्री यांच्या अधिपत्यात राहिलेला आहे. शासनाच्या योजना व नवनवीन उपक्रम इत्यादींची माहिती जनतेपर्यंत पोचवणे ही मुख्य जबाबदारी असलेला माहिती जनसंपर्क हा अत्यंत महत्वाचा विभाग मानला जातो. असे असताना राज्यातील शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती व राजकीय अस्थैर्य पाहता नियम धाब्यावर बसवून अभ्यास दौऱ्याचे नाव करून लाखो रुपयांची उधळपट्टी करत इस्रायल दौरा करणे उचित व संयुक्तिक आहे का असा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे हा दौरा रद्द करावा अशी मागणीही केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button