सोयगाव : आठवडा विशेष टीम―जिल्हा परिषद शाळेचे महत्व तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आणी विद्यार्थी हित जोपासण्यासाठी संतोषीमातानगर पहूरपेठ ता.जामनेर चे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील हे प्रत्यक्ष पालकांना शाळेविषयी छापलेले पत्रक देवून पटवून देत आहेत. भेटी दरम्यान पालकांना आवाहन करित आहे की ,जिल्हा परिषदेच्या शाळेतच आपल्या पाल्यांना दाखल करा. विद्यार्थ्यांची खरी जडणघडण होत असेल तर ती जि.प.च्या शाळेतच. जि.प.च्या शाळेतच मुल्यशिक्षण व गुणवत्तापुर्ण असे शिक्षण शिकायला मिळते.
जि.प.शाळा संतोषीमातानगर शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.स्वयंशिस्तीचे धडे ,स्वच्छता व टापटीपपणा ,मराठी मातृभाषेतून मराठी ,गणित ,इतिहास,विज्ञान,भूगोल ,नागरिकशास्त्,कला, कार्यानुभव,शारिरीक शिक्षण असे उपयुक्त विषय शाळेत प्रामाणिकपणे शिकवले जातात.शिक्षण विभागाचे अधिकारी ,माता-पालक, शिक्षक -पालक,शालेय व्यवस्थापन समितीच्या सभेतून शैक्षणिक गुणवत्तेविषयी माहिती दिली जाते.
गोर-गरीबांच्या मुलांचे शिक्षण व्हावे ,जि.प.च्या शाळेविषयी आवड निर्माण व्हावी तसेच विद्यार्थी पटसंख्या व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संतोषीमातानगर शाळेत जून २०१९ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली सेमी वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय व्यवस्थापन समितीने घेतलेला आहे.
शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील हे शाळेत नाविण्यपुर्ण शैक्षणिक उपक्रम स्वखर्चाने राबवित आहे.त्यांना शाळेतील शिक्षकांचा व पालकांचा प्रतिसाद मिळत असल्याने विद्यार्थी हित जोपासण्यासाठी त्यांची ही उन्हाळ्याच्या सुटीतील धडपड सुरू आहे.