-
उत्तरप्रदेश मधील गोरखपुर येथून शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रसारण
-
पंतप्रधानांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान
-
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे 10 प्रतिनिधी शेतकऱ्यांचा सन्मान
बीड दि.२४ : शेतकऱ्यांच्या अडचणींवर लक्ष देवून त्यांना सशक्त व सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आज उत्तरप्रदेश मधील गोरखपुर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. देशभरातील अल्प आणि अत्यअल्प भूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार असून आज ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे देशातील 12 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ होईल.
गोरखपुर येथील लाईव्ह कार्यक्रमाप्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, वित्त राज्यमंत्री शिवप्रताप शुकला, केंद्रीय कृषि राज्यमंत्री सुर्यप्रताप साहु, खासदार महेंद्र पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कांडला ते गोरखपुर या 2800 कि. मी. लांबीच्या एल. पी. जी. गॅस पाईप लाईन प्रकल्पाचा शुभारंभ, इंडियन इन्स्टीटयुट ऑफ मेडिकल सायन्स तसेच विविध पुल, रस्ते, विज उपकेंद्र, होस्टेल आदी कामांचे डिजिटल उद्घाटन ही प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी देशातील 1 कोटी 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज 2200 कोटी इतकी रक्कम थेट रक्कम जमा करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांची नावे व यादी प्रधानमंत्री किसान पोर्टलवर अपलोड करण्यात येत असल्याने ती माहिती सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे, असे सांगितले.
यापुर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ही शेतकऱ्यांच्याप्रती सरकारची सर्वात मोठी योजना असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध राज्यातुन आलेल्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील गौत्तम पवार हे शेतकरी सहभागी होते. तसेच उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, तामिळणाडु, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यातील शेतकरी प्रतिनिधींना तर काहीना किसान क्रेडिट कार्ड प्रमाणपत्रे व कार्ड देण्यात आली. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी केरळ, बॅगलोर आणि कर्नाटकातील पुतुर येथील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रसारण
जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन सभागृहात गोरखपुर येथे होणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले. यासाठी जिल्हयातील विविध तालुक्यातून शेतकरी उपस्थित होते. त्यांचा यावेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, अधीक्षक कृषि अधिकारी आर. एस. निकम, आत्माचे प्रकल्प संचालक बी. एम. गायकवाड, यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांमध्ये अजित गाडे, पार्वती नाईकवाडे, कल्याण मस्के, नामदेव ढोले, विनोद ढोले, विलास मस्के, बाबासाहेब सुरवशे, आसाराम बजगुडे, शहादेव गायकवाड आणि कलावती गंगाधरे आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सदर योजनेची घोषणा झाल्यानंतर महसुल, ग्रामविकास आणि कृषि विभागाने यासाठी एकत्रित काम करुन जिल्हयातील 81 टक्के लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती शासनास सादर केली असून साडे सहा लाख 7/12 खाते धारक शेतकऱ्यांपैकी जवळपास आडीच लाख शेतकरी लाभार्थ्यांची माहिती प्राप्त झाल्याने त्यांना सदर लाभ देण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले.
यावेळी नामदेव सखाराम ढोले, बार्शी नाका, बीड येथील शेतकऱ्यांने त्यांच्या खात्यात रुपये दोन हजार तात्काळ जमा झाल्याचा आनंद व्यक्त केला.
जिल्हा प्रशासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न अधिकारी-कर्मचारी करत असून त्यांना शेतकऱ्यांनी आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक अशी अत्यावश्यक माहिती बिनचुक उपलब्ध करुन दिल्यास लाभ मिळणे सोपे होणार असल्याचे सांगून सहकार्याचे आवाहन केले.