जिल्हा काँग्रेस कमेटीच्या बैठकीचे २७ ऑगस्ट रोजी बीड येथे आयोजन ,काँग्रेस पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे-जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे आवाहन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार,दिनांक २७ ऑगस्ट रोजी बीड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक पातळीवर आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूका आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बांधणी व बळकटी संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.तरी या बैठकीस जिल्हा काँग्रेस कमेटीचे सर्व पदाधिकारी,विविध सेलचे अध्यक्ष यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की,शुक्रवार,दिनांक २७ ऑगस्ट रोजी बीड येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी २ वाजता बीड जिल्ह्यातील काँग्रेस कमिटी अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष,पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीत जिल्हा कमेटीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सेलचे अध्यक्ष यांच्याशी काँग्रेसचे बीड जिल्हा प्रभारी प्रा.सत्संग मुंडे हे थेट संवाद साधणार आहेत.याप्रसंगी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.या माध्यमातून बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्यात येत आहे.आगामी काळात होणा-या जिल्हा परीषद,पंचायत समिती,नगरपरिषद,नगरपंचायत,ग्रामपंचायत आदींसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूका होणार आहेत.काँग्रेस हा जनसामान्यांचा आणि सर्वधर्मसमभाव जोपासणारा पक्ष आहे,भारतीय जनतेला सोबत घेऊन काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.हे आपण सर्वजण जाणतच आहात.आजही काँग्रेस पक्षावर लोकांचा मोठा विश्वास आहे.या विश्वासाला पुन्हा एकदा जागे करण्यासाठी आणि काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमेटीकडून सातत्यपूर्ण बैठका आयोजीत करण्यात येतात.तसेच विविध उपक्रम देखिल राबविण्यात येतात अशी माहिती जिल्हाध्यक्ष मोदी यांनी दिली.तरी शुक्रवार,दिनांक २७ ऑगस्ट रोजी बीड येथे होणा-या बैठकीसाठी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार,पदाधिकारी, नगरसेवक,बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाधिकाऱ्यांसह महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,सेवादल काँग्रेस,अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्याक सेल,ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया,इंटक आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी यांनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदींकडून करण्यात आले आहे.


दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भारताला महासत्ता बनविले-राजकिशोर मोदी

बीड जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या वतीने जयंतीनिमित्त अभिवादन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी भारत देशाला आधुनिक तंत्रज्ञान बहाल केेले.सोबतच तरूणांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिला.देश महासत्ता व्हावा अशी तरूणांना स्वप्ने देणार्‍या या पंतप्रधानांनी भारताला जागतिक स्तरावर नवी महाशक्ती म्हणुन पुढे आणले.कॉंग्रेस पक्ष आज त्यांचे विचार घेऊन वाटचाल करीत आहे.तरूणांना अधिका-अधिक संधी देण्यात येत आहे.देशातील आठरा पगड जातीधर्माच्या लोकांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष कटीबद्ध असल्याचे विचार कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळेस व्यक्त केेले.बीड जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

देशाचे दिवंगत पंतप्रधान दिवंगत राजीवजी गांधी यांना बीड जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने अंबाजोगाईत सहकार भवन हॉल येथे शुक्रवार,दिनांक २० ऑगस्ट २०२१ रोजी भावपूर्ण आदरांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी वरील विचार व्यक्त केेले.याप्रसंगी उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,शहराध्यक्ष नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक धम्मपाल सरवदे,राणा चव्हाण,भारत जोगदंड,दिनेश घोडके,सुनिल वाघाळकर,विशाल पोटभरे,सचिन जाधव,जुनेद सिद्दीकी,शाकेर काझी,प्रताप देवकर,अकबर पठाण,अमोल मिसाळ यांच्यासह काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रारंभी दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून जिल्हा,तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी पदाधिकार्‍यांनी अभिवादन केेले.


कोरोना योध्दा डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांचा गौरव

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील स्वामी रामानंद तीर्थ व बेथुजी गुरूजी प्रतिष्ठानकडून कोरोना योध्दा डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.दिलीप खेडगीकर हे तर सत्कारमूर्ती डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांच्यासह प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सुरेंद्र खेडगीकर,प्रा.राम चौधरी धर्मापूरीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरूवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी,स्वामी रामानंद तीर्थ व बेथुजी गुरूजी यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी कोविडच्या पहिल्या व दुस-या लाटेत संकटकाळात अहोरात्र रूग्णांची काळजी घेवून रूग्णसेवा करणारे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय ग्रामीण रूग्णालयातील औषधशास्ञ विभागप्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार यांचा “कोविड योध्दा” म्हणून शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.तसेच यावेळेस मॅथ मास्टर (अबॅकस सेंटर) चे प्रमुख प्रकाश अंकम आणि अबॅकस परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त करणारे मुस्तकीन इस्माईल परसूवाले,शोएब शकील पप्पूवाले,रोहन संजय गजाकोष यांचाही गौरवचिन्ह,प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.सत्कारास उत्तर देताना डॉ.सिध्देश्वर बिराजदार म्हणाले की,स्वामी रामानंद तीर्थ व बेथुजी गुरूजी प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी आहे.आपण केलेले कौतुक हा कुटुंबाने पाठीवर दिलेली प्रोत्साहनपर थाप आहे याचा मी स्विकार करतो.सध्या
कोरोना संसर्गाची तीव्रता जरी कमी दिसत असली तरी कोविड पूर्णपणे संपलेला नाही,त्यामुळे अंबाजोगाईकरांनी याचे भान ठेवून तात्काळ कोविड प्रतिबंधक लस घ्यावी,दैनंदिन जीवनात कोरोना पार्श्‍वभूमीवर शासन निर्देशानुसार मास्क,सॅनिटायझर वापरावे,सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्स ठेवावेत.या ञिसुञीचा वापर स्वतः काटेकोरपणे करावा आणि इतरांना ही सांगावे असे आवाहन करून डॉ.बिराजदार यांनी यावेळेस नुकत्याच संपन्न झालेल्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतातील सर्व डाॅक्टर्स,नर्स,ब्रदर आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यरत कर्मचारीवृंद यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी महसूल अधिकारी महेश राडीकर,श्रीधर काळेगावकर,प्रा.डॉ.भगत यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन व सुञसंचालन करून उपस्थितांचे आभार प्रा.राम चौधरी धर्मापूरीकर यांनी मानले.


गो-मय गणेशमूर्ती आणि रक्षाबंधनासाठी वैदिक राख्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश ,वरवटी येथील गो-शाळेचा अभिनव उपक्रम

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
तालुक्यातील वरवटी येथील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळेने गतवर्षीपासून पर्यावरणपूरक अशा गोमय गणेशमूर्ती आणि यावर्षी प्रथमच रक्षाबंधनासाठी आकर्षक अशा वैदिक राख्या तयार केल्या आहेत.यातून पर्यावरण संवर्धन करण्याचा मौलिक संदेश देण्यात आला आहे.अशी माहिती लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळेचे प्रमुख ॲड.अशोक बालासाहेब मुंडे यांनी दिली आहे.

मागील दीड वर्षापासून संपूर्ण जगासमोर कोरोना या संसर्गजन्य रोगराईचे मोठे संकट उभे टाकले आहे.अशा परिस्थितीत आपण अतिशय साध्या पद्धतीने आपले प्रत्येक सण साजरे करीत आहोत.त्याच प्रमाणे यावर्षी आपण सर्वजण गणेशोत्सव ही अतिशय साधेपणाने आणि शासनाने कोविड पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशांचे पालन करीत साजरा करूया.घरच्या घरी कुंडीमध्ये श्रींचे विसर्जन करून पर्यावरण संवर्धन करूया.कारण,मानवी जीवनात आपण नकळत किंवा अजाणतेपणामुळे निसर्गाचा समतोल बिघडविण्याचे काम करीत आहोत.या बाबींचा विचार करून राष्ट्रीय कामधेनू आयोग,भारत सरकार यांच्या मार्गदर्शनानुसार काही गोष्टी व गो-सेवा गतीविधी,देवगिरी प्रांत यांच्या विधायक सूचनांप्रमाणे तसेच गो-शाळेतील गायींचे संगोपनासाठी गो-शाळा स्वावलंबी बनणे गरजेचे आहे.देश-देव अन् धर्मासाठी गो-आधारीत विविध जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करून गो-शाळा स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.याच विचाराला बळ देण्यासाठी गतवर्षीपासून पर्यावरणपूरक आणि आकर्षक अशा “गो-मय गणेशमूर्ती” तयार केल्या,पर्यावरणाची हानी तसेच जल प्रदूषण ही होणार नाही.तसेच जीव दया ही होईल.या विधायक उद्देशाने आम्ही गो-मय गणेशमूर्ती सोबत एक कुंडी व वनौषधींचे-बी आणि भाजीपाल्याचे-बी देण्यात आले.या “गो-मय गणेशमूर्तींना” गणेश भक्तांकडून गतवर्षी भरभरून प्रतिसाद मिळाला.अनेकांकडून रक्षाबंधनासाठी गोमय ‘वैदिक राखी’ मिळेल का अशी विचारणा ही करण्यात आली होती.त्यानुसार यावर्षी प्रथमच गोमय वैदिक राखी तयार केली आहे.तरी ज्या गणेश भक्तांना पर्यावरणपूरक “श्री मूर्ती” आणि पर्यावरणपुरक आकर्षक वैदिक राख्या हव्या आहेत.त्यांनी कृपया ॲड.अशोक बालासाहेब मुंडे, प्रमुख-लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळा वरवटी,ता.अंबाजोगाई,जि.बीड,(संपर्क क्रमांक-9764185272/ 9284408407) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.नुकतेच पुणे येथे रोटरी क्लब कर्वे नगर व जनमित्र सेवा संघ यांच्या वतीने आयोजित समाजभूषण सोहळ्यात गोआधारीत उत्पादन बनविणे,तुळस लागवडीसाठी केलेले कार्य तसेच गाईच्या शेणापासून केलेल्या वैदिक राख्या पाहून पद्मश्री पांडवजी, पद्मश्री गिरीश प्रभुणे, एअर मार्शल भुषण गोखले,रोटरीचे डॉ.परमार,जनमित्र सेवा संघाचे अध्यक्ष ॲड.माऊली तुपे पाटील,डॉ.कुलकर्णी या मान्यवरांकडून लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोशाळेचा केला विशेष गौरव केला हा सन्मान ॲड.अशोक बालासाहेब मुंडे यांनी स्विकारला.याबाबत माहिती देताना ॲड.मुंडे म्हणाले की,४ वर्षापूर्वी जेव्हा गोशाळा सुरू केली होती तेव्हा केवळ १ गाय होती.तिथे आज ७२ गोवंश असून या गोशाळेला स्वावलंबी बनविण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गाय व तुळस आवश्यक आहेत म्हणून जवळपास ३० प्रकारचे गोआधारीत उत्पादने तयार करून निरोगी व सदृढ आरोग्य कसे राहील यासाठी प्रयत्न सुरू आहेत,कोरोना सारख्या महामारीत आपल्याला अनेक अडचणींना समोरे जावे लागले म्हणून गोशाळेत यावर्षी प्रथमच शेण व माती यांच्या मिश्रणातून “गोमय वैदिक राख्या” तयार केल्या आहेत.यात विविध पाले व फळभाज्यांचे “बी” असून राखी पौर्णिमेनंतर वैदिक राखी कुंडीत टाकल्यास त्यातून मिळणारा भाजीपाला हा परिवाराला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास ही मदत होईल.आमच्याकडे गोमय गणेशमूर्तीही उपलब्ध आहेत.यातून पर्यावरण व गोसंवर्धन महत्वाचे आहे हे जागरूक नागरिकांच्या लक्षात येईल आणि लोक “गोमय गणेशमूर्ती आणि गोमय वैदिक राखी” यांना पसंती देतील असा विश्वास ॲड.अशोक मुंडे यांनी व्यक्त केला आहे.


विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने शिक्षण घ्यावे-ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.मीर फरकुंद अली उस्मानी ,न्यु ॲपल ज्युनियर कॉलेज मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरातील न्यु ॲपल ज्युनियर कॉलेज मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.मीर फरकुंद अली उस्मानी यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने शिक्षण घ्यावे असे आवाहन केले.

येथील न्यु ॲपल ज्युनियर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन यशाचा नवा पायंडा पाडला असून या वर्षी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण प्राप्त करून जिशान उस्मानी या विद्यार्थ्याने शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला.सर्व विद्यार्थी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उर्त्तीण झाले आहेत.शाळेचा निकाल शंभर टक्के एवढा लागला आहे.न्यु ॲपल ज्युनियर कॉलेजची यावर्षीची पहिलीच बॅच होती.गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव नुकताच करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.मीर फरकुंद अली उस्मानी हे तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष एस.बी.सय्यद,मार्गदर्शक प्रा.एस.एस.धुळे,सामाजिक कार्यकर्ते मुजीब काझी,डॉ.मीर आरेफ अली उस्मानी,डॉ.सीरत फातेमा उस्मानी,शाळेच्या प्राचार्या एम.एम.सय्यद आदींची उपस्थिती होती.प्रारंभी
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.गुणगौरव प्रसंगी विद्यार्थ्यांना डॉ.मीर आरेफ अली उस्मानी,डॉ.सीरत फातेमा उस्मानी यांनी विशेष मार्गदर्शन केले.तर यावेळेस बोलताना एस.बी.सय्यद म्हणाले की,आम्ही केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की,मुस्लिम समाजात शैक्षणिक मागासलेपण मोठ्या प्रमाणावर आहे,याचे प्रमुख कारण हे मुस्लिम समाजाच्या आर्थिक मागासलेपणात दडले आहे असे सय्यद म्हणाले.तर प्रा.एस.एस.धुळे यांनी यावेळेस बोलताना न्यु ॲपल ज्युनियर कॉलेजला गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे नमूद केले,यावेळेस मुजीब काझी यांनी ही उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.प्रास्ताविक करताना मीर तारेख अली उस्मानी म्हणाले की,आज आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जाणार आहोत.शिक्षण घेताना आपल्या मनात ध्येय व जिद्द असली पाहिजे,आपल्याकडे सर्वगुण संपन्नता पाहिजे.न्यु ॲपल ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहोत असे मीर तारेख अली उस्मानी म्हणाले.अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.मीर फरकुंद अली उस्मानी यांनी विद्यार्थ्यांना मौलिक संदेश दिला.कार्यक्रमाचे सुञसंचालन करून उपस्थितांचे आभार प्रा.सय्यद हसन गफूर यांनी मानले.या कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.मलेका शेख खालेक,प्रा.सिद्दिकी किरतऐन,प्रा.मेहरून्निसा मुशर्रफ हाश्मी
यांनी विशेष परिश्रम घेतले.

साहित्यिक सखी ग्रुपकडून अंबाजोगाईत एकाचवेळी ९ पुस्तकांचे प्रकाशन , साहित्यिक सखी ग्रुपचे कौतुकास्पद कार्य-गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
शहरात साहित्यिक सखी ग्रुपकडून अंबाजोगाईत आयोजित कार्यक्रमात एकाचवेळी ९ पुस्तकांचे प्रकाशन सुप्रसिध्द गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

कोरोना सारख्या संकटात साहित्यिकांची लेखणी आणि मनाचे मनोरे फुलले,याचा परिणाम म्हणजे साहित्यिक सखी ग्रुप स्थापन करून आपल्या साहित्य लेखणीतुन ९ पुस्तके तयार केली.उदगीर येथील साहित्यिक सखी ग्रुपने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असून एकाच वेळी ९ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध कवी प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला.यावेळेस बोलताना गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे म्हणाले की,महिलांच्या लिहित्या हाताला बळ आणि प्रोत्साहन देण्यासाठी महिला साहित्यिकांचा ग्रुप ही अभिनव कल्पना या क्षेत्रात ऐतिहासिक असून या ग्रुपमधील कर्तुत्ववान महिलांनी आपल्या भावना आणि विचार कविता कथा अति लघु कथा चारोळी अशा साहित्य प्रकार मधून व्यक्त केलेले आहेत. ‘कोष’-अश्विनी महेश निवर्गी,-सौ अर्चना गोपाळकृष्ण नळगिरकर, ‘काव्यतुरा’-सौ मंजरी प्रसन्न मार्लेगावकर, ”- अश्विनी महेश निवर्गी, ‘-अश्विनी महेश निवर्गी, ‘मला मी भेटले नव्याने’-सौ क्षमा वाखारकर, ‘ओंजळ कवितांची- भाग एक’, ‘ओंजळ कवितांची भाग-दोन’,आणि ‘तिच्या लेखणीतून’ ही तीन पुस्तके – सौ अश्विनी महेश निवर्गी, सौ अर्चना गोपाळकृष्ण नळगिरकर, सुनंदा अशोक सरदार, प्रा. सौ अश्विनी संजय देशमुख या चार कवयत्री आणि कथाकार महिलांनी संपादित केली आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दोनशे महिला या साहित्यिक ग्रुपमध्ये सहभागी झाल्या असून सातत्याने वाचन, लेखन, चिंतन, मनन आणि प्रगटीकरण या भाव- अवस्थेतून जात आहेत. या सकस आणि सुंदर समुदायाचा परिणाम म्हणून ही साहित्य क्षेत्रातही भरीव कामगिरी या सर्व महिला कौटुंबिक कामगिरी सांभाळत असताना करत असल्याचे पाहून मनस्वी आनंद होतो आहे. कविता आणि कथेच्या माध्यमातून त्यांनी जगण्याला सुचवलेल्या नवनव्या वाटा विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. वाचकांनी या नवीन वाटांचा निश्चितपणे विचार करायला हवा. या सर्व महिलांच्या साहित्यिक समुदायाच्या सातत्यपूर्वक उपक्रमशील तिला मनःपूर्वक या लिहित्या हातांचा आपल्याला आभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

उदगीर येथील साहित्यिक महिला ग्रुपच्या लेखिकांनी संपादित केलेल्या ९ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा अंबाजोगाईत मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी यांच्या निवासस्थानी नुकताच आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गझलकार प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय अक्षय सागर हे होते. तर यावेळेस ग्रुपच्या आयोजक आश्विनी निवर्गी,अर्चना नळगीरकर,सुनंदा सरदार,प्रा.अश्विनी देशमुख,उषाताई तोंडचिरकर यांच्यासह अपर्णा कुलकर्णी,नवोदित लेखिका कु.सायली संजय,श्रीमती उषाताई,मेजर एस.पी.कुलकर्णी,पुजा कुलकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.साहित्यिक सखी ग्रुपच्या महिलांनी एकत्रित येऊन आश्विनी निवर्गी,मंजिरी मार्लेगावकर,शमा वाखरकर आदींच्या सहभागातून कथा,कवितासंग्रह,लघुकथा,ई-बुक्स अशा विविध साहित्य प्रकाराच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले.या कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्ज्वलन व प्रतिमापूजनाने झाली.उषाताई तोंडचिरकर यांनी स्वागतगीत सादर केले.याप्रसंगी आश्विनी निवर्गी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वलिखित तीन पुस्तकांचा प्रवास कसा झाला ? हे अनुभव विषद केले,तर मंजिरी मार्लेगावकर यांनी कविता व गझल सादर केल्या,नवोदित लेखिका कु.सायली कुलकर्णी,पुष्पा चपळगावकर आणि मेजर एस.पी.कुलकर्णी यांच्या मनोगतानंतर अध्यक्षीय समारोप करताना विजया क्षीरसागर म्हणाल्या की,साहित्यिक क्षेत्रात लेखकांनी आपल्यातल्या सद्गुणांचा वापर करत ग्रुपच्या माध्यमातून कोरोना सारख्या संकटात बहरलेल्या लेखणीचा फुलोरा वाचकांच्यासाठी खुला केला याचा मनस्वी आनंद वाटत असल्याचे त्या म्हणाल्या.”सखी ग्रुप” म्हणजे महिलांनी महिलांसाठी तयार केलेले महिलांचे व्यासपीठ आहे.कुटुंब आणि संसाराची जबाबदारी सांभाळत महिलांची आनंदाची मानसिकता आणि चळवळ या उपक्रमातून निर्माण होते.कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन प्रा.डॉ.सीमा पांडे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार अपर्णा कुलकर्णी यांनी मानले.यावेळी डॉ.महेश निवर्गी,गोपाळकृष्ण नळगीरकर,प्रसन्न मार्लेगावकर,भूषण क्षीरसागर,अर्चना अन्सरवाडकर,प्रेम सागर आदींसह लेखिकांची उपस्थिती होती.ज्येष्ठ महिला उषा कुलकर्णी यांनी स्वरचित कवितेचे वाचन करून आपल्या उद्बोधक रचना सादर केल्या.तर गझलकार प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे यांनी आपल्या प्रसिद्ध गझलांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.एकाच वेळी ९ पुस्तकांचे प्रकाशन होणे ही साहित्यिकांसाठी पर्वणीच असून कोरोना सारख्या संकटात मागील दीड वर्षात असा कार्यक्रम शहरात झाला नाही. हा उल्लेख डॉ.राजपंखे यांनी आवर्जुन केला.उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सखी ग्रुपच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या सर्व लेखिकांचे आणि त्यांच्या भूमिकांचे गझलकार प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे यांनी मनापासून स्वागत केले.तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात कविता,गझल व लघुकथा यांचे आनंददायी वातावरणात सादरीकरण करण्यात आले.


पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

शिक्षिका वर्षाताई मुंडे लिखित “बालमन फुलवताना” पुस्तकाचे प्रकाशन

भाशिप्रचा शिक्षक लेखक होतो त्याचा मोठा आनंद – कार्यवाह नितीन शेटे

अंबाजोगाई: भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत काम करणारा शिक्षक स्वत: अंतःर्मुख होवुन जेव्हा आपल्या ज्ञानाचे प्रगटीकरण करतो आणि पुस्तकाच्या माध्यमातून आलेले अनुभव समाजासमोर मांडतो अशा शिक्षक लेखकाचा संस्थेला सार्थ अभिमान असून अशा शिक्षकांच्या पाठीशी संस्था उभी आहे व प्रोत्साहनच देते,शिक्षिका सौ.वर्षाताईने लिहिलेलं पुस्तक वर्तमान युगात बालक,पालक आणि शिक्षक यांच्यातील संवादाचे प्रकटीकरण आणि भविष्याच्या व्यक्तिमत्वाचे सदृढीकरण असल्याचे प्रतिपादन भाशिप्र संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे यांनी केले.

येथील खोलेश्वर प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका सौ.वर्षाताई विजय कराड यांनी लिहिलेल्या “बालमन फुलवताना” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात संपन्न झाला.त्याप्रसंगी भाशिप्र संस्थेचे कार्यवाह शेटे हे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष ॲड.किशोर गिरवलकर हे होते.तर विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्थान राष्ट्रीय मंत्री देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ.मधुश्री संजय सावजी यांची विशेष उपस्थिती लाभली.तसेच यावेळेस कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर,प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल देशपांडे,मुख्याध्यापक आप्पाराव यादव,लेखिका वर्षाताई मुंडे आदींची उपस्थिती होती.व्यासपीठावरील मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर सर्वांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ.अतुल देशपांडे यांनी संस्थेतील शिक्षिकांनी लिहिलेल्या पुस्तकाचे जाहिर स्वागत करून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी बोलताना बिपीनदादा क्षीरसागर यांनी पुस्तकाच्या आशय व विषय निवडीचे कौतुक करून वर्तमान काळात अशा लेखकांची समाजाला नितांत गरज असल्याचे सांगितले.तर डॉ.मधुश्री सावजी यांनी पुस्तकाचे विमोचन करताना लहान मुलांच्या सोबत एकरूप होवुन शिक्षकाने त्याचे केलेले पालकत्व हे भावी आयुष्याच्या उद्धारासाठी किती महत्वाचं असते ? हे सांगताना अनेक मौलिक उदाहरणे दिली.वर्षाताई यांचे कौतुक करताना त्यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख आवर्जुन त्यांनी केला.आपल्या भाषणात सुरूवातीलाच बोलताना कार्यवाह नितीन शेटे म्हणाले की,संस्थेमध्ये अशा प्रकारे लेखक तयार व्हावेत,यासाठी त्यांना आमच्याकडून नेहमीच प्रोत्साहनपर ताकद देण्यात येते.या पुस्तकाच्या ५०० प्रती संस्था घेणार असल्याचे त्यांनी यावेळेस जाहीर केले.आपल्या संस्थेचा संस्कार अंगीकृत करून जबाबदारी आणि कर्तव्याचे पालन करणे हाच मुळ उद्देश असल्याचं सांगून त्यांनी भाशिप्र संस्थेत इतरही अनेक शिक्षक,प्राध्यापक,प्राचार्य हे साहित्यिक आणि लेखक असल्याचे गौरवपूर्ण शब्दांत मान्यवरांच्या समोर नमूद केले.याप्रसंगी आप्पाराव यादव यांनी ही मनोगत व्यक्त केले.त्यानंतर लेखिका वर्षाताई मुंडे यांनी कृतज्ञता भाव व्यक्त केला.वर्षाताई यांनी आपल्या मनोगतात आपल्याला शिक्षक म्हणून आलेले काही अनुभव संचित करून लिखित स्वरूपात ते समाजासमोर आणण्याचा हा छोटा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.डॉ.सावजी ताईंनी शिक्षण क्षेत्रात कसे योगदान द्यावे आणि शुद्ध कर्मातून आनंद कसा मिळवता येतो ? अगदी मार्गदर्शनपर वैचारिक भाषण केले.शिवाय पुस्तकाच्या पृष्ठभागावरील काल्पनिक चित्र आणि त्यातून घेता येणारा अर्थ म्हणजेच लहान मुलं आई-वडिलांचं बोट धरून जेव्हा योग्य दिशेने जातो आणि एक चित्र असं ज्या मुलाला वडील आकाशात भरारी घेण्यासाठी पंखात बळ भरतात याचे त्यांनी विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शितल बोधले यांनी केले तर उपस्थितांचे आभार काळे मॅडम यांनी मानले.या कार्यक्रमाला राम कुलकर्णी,खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे,लक्ष्मणराव मुंडे,सौ.गवळणबाई मुंडे आदी मान्यवरांसह शिक्षकांची उपस्थिती होती.


जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेतर्फे २२ वा कारगिल विजय दिवस साजरा

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील जय जवान आजी माजी सैनिक संस्थेतर्फे सोमवार,दिनांक २६ जुलै रोजी २२ वा कारगिल विजय दिवस शहिदांना अभिवादन करून साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास जय जवान आजी माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅ.पांडुरंग रघुनाथराव शेप व संपूर्ण संचालक मंडळ आणि संस्थेतील अंदाजे दोनशेहून अधिक सभासद,महिला भगिनी,युवक उपस्थित होते.प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष कॅ.पांडुरंग शेप व कॅ.सय्यद खाजा नजिमोद्दीन या दोघांनी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.कारगील युद्धातील शहीद जवानांना अभिवादन केले.याप्रसंगी जय जवान आजी माजी सैनिक संस्था परिसरांमध्ये अभिवादन सभा घेण्यात आली.सभेचे सूत्रसंचालन महादेव कांदे यांनी केले.या सभेच्या सुरूवातीला संस्थेचे सचिव कॅ.अभिमन्यू शिंदे यांनी सभेपुढे कारगिल युद्धाचा इतिहास कथन केला.यानंतर कारगिल युद्धात ज्यांचा सक्रिय सहभाग होता असे संस्थेचे ज्येष्ठ संचालक कॅ.शेख उस्मान यांनी कारगिल युद्धातील स्वतःच्या अनेक आठवणी सांगून जे जवान कॅ.उस्मान यांच्या प्रत्यक्ष डोळ्यांसमोर युद्धामध्ये शहीद झाले.त्या शहीद जवानांच्या शौर्याचे त्यांनी भावपूर्ण शब्दांत वर्णन केले.शहीद जवानांच्या कुटुंबावर जे दुःख व संकट आले.त्या संकटांवर मात करण्याची ताकद जगाच्या निर्मात्याने त्यांना द्यावी असे भावनिक विचार त्यांनी व्यक्त केले.शेवटी सभेचे अध्यक्ष कॅ.पांडुरंग शेप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कारगिल युद्धातील शहीद जवानांविषयी दुःख व्यक्त केले.व कारगील युद्धाचा संपूर्ण इतिहास सभेसमोर ठेवला.कॅप्टन शेप म्हणाले की,जे शहीद झाले त्या जवानांच्या अंत्यविधी पर्यंतच शासकीय अधिकारी दुःख व्यक्त करतात पण,नंतर माञ त्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना शासनस्तरावर कोणीही विचारत नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत,सहकार्य केले जात नाही.त्यामुळे आता इथून पुढे आपण सर्व सैनिक परिवारांनी एकञ येऊन,याप्रश्नी लक्ष देऊन प्रयत्नशील राहूयात.जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेच्या माध्यमातून विविध प्रश्नांची सोडवणूक करून सैनिक कुटुंबाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करावे लागेल असे कॅ.पांडुरंग शेप यांनी सांगितले.त्यानंतर सभेची सांगता झाली.

माध्यमिक शालांत प्रमाणपञ परीक्षेत जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल ,उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षीही कायम

अंबाजोगाई (प्रतिनिधी):
येथील श्री.बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपञ परीक्षा मार्च-२०२१ (इयत्ता १० वी) चा निकाल १०० टक्के इतका लागला आहे.यावर्षी मार्च-२०२१ रोजी झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपञ परीक्षेस एकूण ६९ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी ३४ विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उर्त्तीण झाले आहेत.तर ३५ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक
विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान विद्यार्थीनी कु.प्रिया किर्दंत (९३.६० टक्के),चि.ओमकेश तोंडे (९१.८० टक्के) हा विद्यार्थी सर्वद्वितीय,तर विद्यार्थीनी चि.पवन शिंदे (९१.४० टक्के) तृतीय क्रमांक घेऊन हे विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे.तसेच चि.सुनिल राठोड याने (९१.२ टक्के),कु.नंदिनी जाधव हिने (९०.४ टक्के) व आदित्य चव्हाण याने (९० टक्के) एवढे गुण घेवुन यश संपादन केले आहे.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच मुख्याध्यापक चंद्रकांत गायकवाड,विषय शिक्षक व्ही.ए.मुंजे, आर.एस.कांबळे,बी.एच.अंबाड,श्रीमती व्ही.जी.गुळवे,बी.एम.पवार,श्रीमती एम.डी.अकोलकर,आर.ई.कागणे,एन.के.गायके आणि सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी,मार्गदर्शक डॉ.डी.एच.थोरात,प्रा.वसंतराव चव्हाण,संस्थेचे अध्यक्ष भुषण मोदी, संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी, संचालक सुरेश मोदी तसेच शिक्षणप्रेमी पालक आदींनी अभिनंदन केले आहे.

*विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच शंभर टक्केे निकालाचे सातत्य-राजकिशोर मोदी*
———————————-
समाजातील उपेक्षीत घटकांना शिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे परिश्रम व जिद्द व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच 100 टक्केे निकालाचे सातत्य हे गेल्या आठरा वर्षांपासून अबाधित आहे.आज विद्यालयाचे नांव शैक्षणिक क्षेञांत आघाडीवर आहे.विद्यालयाच्या यशामुळे संस्थेचे नांव राज्यस्तरावर उज्ज्वल होत असल्याचा मनापासून आनंद होतो.विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी संस्थेमार्फत आम्ही प्रयत्नशील राहू असे संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी यांनी यावेळी आवर्जून नमूद केेले.

संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अभिवादन

अंबाजोगाई (वार्ताहर): संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवार,दिनांक १८ जुलै रोजी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदींकडून अभिवादन करण्यात आले.

अंबाजोगाई येथील सहकार भवन हॉल मध्ये रविवारी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदींकडून संत शिरोमणी नामदेव महाराज आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.प्रारंभी प्रतिमापूजन व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रबोधनपर कार्याचे स्मरण करताना जिल्हाध्यक्ष मोदी म्हणाले की,संत शिरोमणी नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते.ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते.त्यांनी “व्रज” भाषांमध्येही काव्ये रचली.शिख बांधवांच्या “गुरू ग्रंथ साहिबा” तले चरित्रकार,आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाब पर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.त्यामुळे पंजाबी बांधवांनी आज त्यांच्या जन्मस्थान “नरसी नामदेव” या गावाचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवत धर्माचा प्रचार केला.प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले.पंजाब मधील शीख बांधवांना ते आपलेच वाटतात.’संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.संत नामदेवांनी कीर्तने करीत संपूर्ण भारतभर प्रवास केला असे सांगून जिल्हाध्यक्ष मोदी यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचे ही यावेळी स्मरण करताना सांगितले की,अण्णा भाऊ साठे हे एक लोकशाहीर,समाजसुधारक,लोककवी आणि लेखक होते.त्यांचे लेखन हे सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे.महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरले आहे.अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो.आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात.संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रूजविण्याचे महत्त्वपूर्ण काम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे,शाहीर अमर शेख,शाहीर साबळे आणि शाहीर द.न.गव्हाणकर यांनी केले.मुंबई,मराठवाडा,विदर्भ,कोकण,पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.त्यांच्यामुळे लोक प्रेरित झाले.मराठी भाषेत साठे यांनी नाटके,लोकनाट्य,रशियातील भ्रमंती हे प्रवासवर्णन,कथासंग्रह,कादंब-या,शाहिरीवर पुस्तक आणि मराठी पोवाडा शैलीतील गाण्यांसह त्यांची विपुल अशी साहित्यकृती आज ही उपलब्ध आहे.मुंबई मधील शहरी जीवनाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,राणा चव्हाण,सुनिल वाघाळकर,अकबर पठाण,शरद काळे,अजीम जरगर,शाकेर काझी आदींसह काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


महाराष्ट्र राज्य एन.जी.ओ.फेडरेशनच्या प्रदेश सचिवपदी अविनाश तोंडे यांची निवड

अंबाजोगाई (वार्ताहर): महाराष्ट्र राज्य एन.जी.ओ.फेडरेशनच्या प्रदेश सचिवपदी अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश लक्ष्मणराव तोंडे यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य एन.जी.ओ.फेडरेशनचे अध्यक्ष दिपक सोपान आगळे (ता.नेवासा,जि.अहमदनगर) यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य एन.जी.ओ.फेडरेशनच्या प्रदेश सचिवपदी अंबाजोगाई येथील अविनाश लक्ष्मणराव तोंडे यांची निवड केली आहे.निवडीचे पञ नुकतेच अविनाश तोंडे यांना प्राप्त झाले आहे.सदरील निवड पञात महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक संस्था,संघटना व या सामाजिक क्षेत्रामधे आपल्याला सामाजिक संस्थेचे संघटन करून सामाजिक संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी आपणाला आम्ही ही जबाबदारी सोपवत आहोत.चांगले काम करण्याची संधी एन.जी.ओ.फेडरेशन देत आहे तरी आपण संघटत्माक कामावर भर द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.अंबाजोगाई येथील अविनाश लक्ष्मणराव तोंडे हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक तसेच सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांना सामाजिक प्रश्नांची चांगली जाण आहे.बांधिलकीतून ते कार्य करीत आहेत.तोंडे हे वाघाळा ग्रामपंचायतचे मागील २५ वर्षे सदस्य आहेत.तसेच आधारवड वृद्धाश्रम अंबासाखर कारखाना,श्री तांबवेश्वर सेवाभावी संस्था संचलित केंद्रीय निवासी शाळा वाघाळा,ज्ञानमंदिर प्राथमिक स्कूल अंबेजोगाई या संस्थांशी निगडीत व श्री तांबवेश्वर ग्रुप ऑफ कंपनीचे ते चेअरमन असून श्री तांबवेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून त्यांनी आजपावेतो शेतकरी बांधवांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या भूमिकेतून विविध कामे केली आहेत.महाराष्ट्र राज्य एन.जी. ओ.फेडरेशनच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल अविनाश तोंडे यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन व स्वागत होत आहे.


शेतक-यांना दलालांच्या जाळ्यात अडकविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव –भाजपा पक्ष प्रवक्ते राम कुलकर्णी यांचे टीकास्त्र

अंबाजोगाई (वार्ताहर): राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कृषी कायद्यांमधील प्रस्तावित सुधारणा म्हणजे निव्वळ धूळफेक असून केंद्र सरकारने आपल्या कायद्यांद्वारे शेतकऱ्यांना देऊ केलेले संरक्षण काढून घेऊन सामान्य शेतकऱ्याची मान पुन्हा दलालांच्या कचाट्यात अडकविण्याचा महाविकास आघाडी सरकारच्या डाव आहे अशी खरमरीत टीका भाजपा पक्ष प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

कृषी कायद्यांमधील प्रस्तावित सुधारणांमुळे दलालांना पुन्हा मोकळे रान मिळणार असून त्यांचे खिसे भरण्याचा राज्य सरकारचा हेतू असल्याने सुधारणा मंजूर न करता केंद्राचे कृषी कायदे जसेच्या तसे स्वीकारले पाहिजेत अशी मागणीही भाजपा प्रवक्ते कुलकर्णी यांनी केली आहे.याबाबत ते म्हणतात की,महाराष्ट्र सरकारने मांडलेल्या तीन कायद्यांवर दोन महिन्यांत जनतेची मते मागविली आहेत.राज्य सरकारने केंद्र सरकारचे कायदे फेटाळण्याऐवजी काही सुधारणा सुचविल्या असल्या तरी,केंद्राने केलेल्या तीनपैकी दोन कायदे महाराष्ट्रात अगोदर पासूनच अस्तित्वात होते.हमीभावापेक्षा कमी भावाने विक्री संदर्भात शेतकऱ्यांना संरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे.राज्य सरकारच्या प्रस्तावित सुधारणेत ही बाब स्वीकारण्यात आली आहे.मात्र,शेतकरी व पुरस्कर्ता हे परस्पर संमतीने दोन वर्षांच्या कालावधी करीता किमान आधारभूत किंमतीहून कमी किंमतीचे कृषी करार करू शकतील,असे राज्य सरकारच्या प्रस्तावित सुधारणेत म्हटले आहे.ही बाब म्हणजे,शेतकऱ्यांची आडवणुक करून दलालांना रान मोकळे करून देण्याची पळवाटच आहे,दोन वर्षांचे करार कितीही वेळा शेतकऱ्यांसोबत करता येण्याच्या या छुप्या तरतुदीमुळे हमीभावा पेक्षा कमी भावाने खरेदी करण्याची मुभा व्यापाऱ्यास मिळणार आहे.ज्या पिकांकरिता हमीभाव नाही,त्या पिकांकरिता शेतकरी व व्यापारी परस्पर संमतीने कृषी करार करू शकतील असेही म्हटले असले,तरी त्या मध्येही राज्य सरकारने पळवाट ठेवली आहे.अत्यावश्यक वस्तू अधिनियमात सुचविलेल्या सुधारणे नुसार हा कायदा शिथिल करण्याचे अधिकार केंद्रासोबत राज्य सरकारलाही मिळणार आहेत.त्यामुळे केंद्र सरकारचे तीनही कायदे सरकारने मान्य केलेले असल्याने,एवढे दिवस केंद्राचे कायदे मान्य करण्यात केवळ अडवणूक करण्याचे राज्य सरकारचे धोरण स्पष्ट झाले आहे,असेही या पत्रकात भाजपा पक्ष प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे.राज्यातील बहुतांश दलाल हे सत्ताधारी पक्षांचे समर्थक आहेत याकडे लक्ष वेधून त्यामुळेच त्यांच्या हिताचे संरक्षण करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा महाविकास आघाडी सरकारचा इरादा हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी विरोधी सरकार सोबत भारतीय जनता पक्ष तीव्र संघर्ष करेल असा इशाराही भाजपा प्रवक्ते कुलकर्णी यांनी दिला आहे.


श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे जीपॅट व एनआयपीईआर-२०२१ या राष्ट्रीय परीक्षेत घवघवीत यश

अंबाजोगाई (वार्ताहर): श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारतात राष्ट्रीय स्तरावर एनटीए मार्फत घेण्यात आलेल्या जीपॅट व एनआयपीईआर परीक्षेत घवघवीत यश संपादन करून अंबाजोगाई आणि महाविद्यालयाचे नांव उंचावले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाची स्थापना सन २०१० साली मोदी लर्निंग सेंटर,रिंग रोड, अंबाजोगाई या ठिकाणी करण्यात आली.अंबाजोगाई हि शिक्षणाची पंढरी म्हणुन सर्वदूर प्रसिध्द आहेच परंतु,अंबाजोगाई मध्ये विद्यार्थ्यांना मेडीकल आणि इंजिनिअरींग या क्षेत्रापेक्षा वेगळे क्षेत्र परीचीत नव्हते आणि हिच गरज ओळखून या मंडळाचे सचिव राजकिशोर मोदी यांनी औषध निर्माणशास्त्र पदवी आणि पदव्युत्तर आणि औषधनिर्माण शास्त्राचा डिप्लोमा कोर्स हा सर्व सोयी सुविधांची उपलब्धता करून दिले आहेत.या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळेत औषध निर्माण करण्याच्या सर्व सोयी,सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांना तज्ञ प्राध्यापकांमार्फत लेखी तसेच प्रात्यक्षिकांमधून उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण याठिकाणी देण्यात येते.आज विद्यार्थी १२ वी नंतर फक्त मेडीकल आणि इंजिनिअरींग कडेच वळतो.परंतू,या दोन क्षेत्रापेक्षाही अनेक क्षेत्र आहेत.ज्यामध्ये विद्यार्थी आपले करीअर घडवू शकतो.याचा प्रत्यय देणारे उदाहरण म्हणजे या महाविद्यालयातील ८ विद्यार्थी सर्वोत्तम गुण घेवुन उत्तीर्ण झाले आहेत.सदरील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एम.फार्मसी या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्याला दरमहा १२०००/- रूपये विद्यावेतन मिळते.या परीक्षा मध्ये कु.गितांजली शेवाळे हिने २४५ गुण संपादन करून भारतात २४१ वा क्रमांक मिळविला आहे.तसेच अनुसया सौंदणकर हिने २०७० वा सलोनी मुथा हिने १८५१ वा कु.स्वाती गुंजकर हिने २०७० वा अंजली माचवे हिने २३२३ वा तर दिनेश राऊत याने ३४६९ तसेच जिनीषा डागा हिने ३४६९ आणि धनश्री मुंदडा हिने २५४० वा क्रमांक मिळविलेले आहे.तसेच एनआयपीईआर-२०२१ या परीक्षेमध्ये अंजली माचवे हिने संपूर्ण भारतात ८५० वा अनुसया सौंदणकर हीने १०४८ वा सलोनी मुथा हिने १४३४ वा आणि दिनेश राऊत याने २२८८ वा क्रमांक प्राप्त केला आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी हे सिध्द केले.की,मनात जिद्द असली की कुठल्याही शाखेत तितकेच यश प्राप्त करता येते.त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या उच्च शिक्षणासाठी विविध पर्यायांचा नक्की विचार करायला हवा आहे.आजच्या स्पर्धेच्या युगात आता आयुष्याभरासाठी नोकरी मिळणे हे २१ व्या शतकामध्ये कमी होणार आहे.हा विचार मनात ठेवून कौशल्य अभ्यासक्रम आत्मसात करावा.संस्थेतर्फे बी-फार्मसी,एम-फार्मसी,डी-फार्मसी हे अभ्यासक्रम (कोर्सेस) शिकविले जातात.विद्यार्थ्यांच्या यशामध्ये प्राचार्य कृष्णा झांबरे,प्राचार्य डॉ.संतोष तरके,प्रा.नरेशकुमार जैस्वाल,मंजुषा केरप्पा आणि इतर सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी,प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी प्रा.वसंतराव चव्हाण, डॉ.डी.एच.थोरात,संस्थेचे अध्यक्ष भूषण मोदी,कार्यकारी संचालक संकेत मोदी यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने अंबाजोगाईत धरणे प्रदर्शन व घंटानाद आंदोलन

अंबाजोगाई (प्रतिनिधी): राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आणि सर्व सहयोगी कर्मचारी,सामाजिक संघटना यांच्या वतीने अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,भटक्या विमुक्त जाती,विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी या बहुजनांच्या संविधानिक प्रतिनिधित्व (आरक्षण) आणि हक्क अधिकार संपविणाऱ्या धोरणाच्या व शासन आदेशांच्या विरोधात “प्रतिनिधित्व(आरक्षण) बचाओ,लोकतंत्र बचाओ आंदोलन” महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात एकाच वेळी ३५८ तालुक्यासह अंबाजोगाईत ही चरणबध्द राज्यस्तरीय आंदोलनाचा एक भाग म्हणून सोमवार,दिनांक १२ जुलै रोजी धरणे प्रदर्शन व घंटानाद करून आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ द्वारा दि.२६ जून ते २६ जुलै २०२१ पर्यंत सुरू असलेल्या “प्रतिनिधित्व बचाओ-लोकतंत्र बचाओ” आंदोलनाचा आज दुसरा टप्पा धरणे आंदोलन आणि घंटानाद आंदोलन हे यशस्वीरित्या संपन्न झाले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी,अंबाजोगाई यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.निवेदन देताना आर.डी.वैरागे, सी.वी.सरवदे,महादेव आगळे,रिझवान शेख,नासेर शेख,संजीव उमाप, प्रा.डॉ.मोहन मिसाळ,गोविंद सोन्नर,ॲड.दिलीप गोरे,व्यंकटेश गडदे,ज्योती मिसाळ,सुरेखा उमाप,केशर गडदे,सिंधुताई वाघमारे,शीतल वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामनजी मेश्राम यांचे नेतृत्वात दि.२६ जून २०२१ पासून सुरू करण्यात आलेले हे आंदोलन २६ जुलै २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे.या आंदोलनातील मुद्दे पुढील प्रमाणे आहेत – अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त आणि विशेष मागास प्रवर्गातील सरकारी निमसरकारी व शासकीय आणि सार्वजनिक सेवेतील कर्मचारी व अधिकारी यांचे पदोन्नतीतील आरक्षण रोखण्याच्या धोरणाच्या विरोधात आणि दिनांक १८/०२/२०२१,२०/०४/२०२१ व दिनांक ७ मे २०२१ च्या शासन निर्णयांच्या विरोधात,महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात, शासकीय,निमशासकीय,शासन अनुदानित शासकीय व सार्वजनिक उपक्रमातील अस्थापनांमध्ये नियमाप्रमाणे बिंदूनामावली अद्ययावत न करता व अनुशेष भरती न करता होणाऱ्या नियमबाह्य भरती प्रक्रियेच्या विरोधात, ओबीसी प्रवर्गास पदोन्नतीतील आरक्षण लागू न करण्याच्या धोरणाच्या विरोधात,सर्व शासकीय, निमशासकीय,शासन अनुदानित शासकीय व सार्वजनिक उपक्रमातील आस्थापनांमध्ये वर्षानुवर्षे भरती न करण्याच्या व निवड झालेल्या उमेदवारांना पद नियुक्ती न देण्याच्या धोरणाच्या विरोधात,महाराष्ट्रातील सरकारी,निमसरकारी व सार्वजनिक उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांना डीसीपीएस/एनपीएस योजना लागू करून जुनी पेन्शन बंद करण्याच्या धोरणाच्या विरोधात.राज्य शासनाच्या शासकीय व सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाच्या विरोधात.घर कामगार नाका कामगार,सफाई कामगार इ.असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंद न करण्याच्या शासन धोरणाच्या विरोधात, शेतकरी विरोधी केंद्रीय कायदे लागू करण्याच्या धोरणाच्या विरोधात,कामगारांचे संवैधानिक अधिकार नष्ट करण्यासाठी कामगार हिताचे कायदे रद्द करून निर्माण केलेल्या नवीन काळ्या कामगार कायद्यांच्या विरोधात, मराठा समाजाला संवैधानिक आरक्षण लागू न करण्याच्या धोरणाच्या विरोधात,शिक्षण सेवक,सीएचबी व ॲडव्हॉक पदावरील प्राध्यापक / कर्मचाऱ्यांना आणि गट साधन केंद्रातील विषय तज्ञ व साधन व्यक्ती कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी न देता वेठबिगारासारखे राबविण्याच्या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना शासकीय कर्मचारी न मानता त्यांना नियमित वेतनश्रेणी न देण्याच्या धोरणाच्या विरोधात, लॉकडाऊनमुळे प्रभावित होऊन जिने असह्य झालेल्या परिवारांना पर्याप्त मदत न देता मुत्युच्या खाईत लोटण्याच्या शासनाच्या धोरणाच्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामनजी मेश्राम यांचे नेतृत्वात प्रतिनिधित्व (आरक्षण) बचाओ, लोकतंत्र बचाओ आंदोलन तसेच महाराष्ट्र सरकारच्या बहुजन समाजातील कामगार, कर्मचारी,अधिकारी,मजूर,शेतकरी,विद्यार्थी, महिला,व्यावसायिक, यांच्या विरोधात घेतलेल्या बहुजन विरोधी धोरणांच्या कायद्यांच्या आणि शासन आदेशांच्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने या पूर्वीही शांततेच्या मार्गाने वेळोवेळी कालिफित निषेध आंदोलने केलेली आहे.परंतु,शासनाचे बहुजन विरोधी धोरण आणि कायदे करण्याचे सत्र सुरूच आहे.शासनाच्या या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात यावर्षी आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करून हे ४ टप्प्यातील तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.त्यामुळे अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,भटक्या विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी या बहुजन समाजातील कर्मचारी, कामगार,अधिकारी,डॉक्टर, वकील,इंजिनियर,प्राध्यापक, विद्यार्थी,महिला,बुद्धिजीवी आणि विविध राजकीय,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते सभासद यांनी या “प्रतिनिधित्व (आरक्षण) बचाओ,लोकतंत्र बचाओ” या आंदोलनात तन-मन-धनाने सहभागी होऊन,साथ आणि सहयोग करावा व आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत अशी विनंती व आवाहन राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात येत आहे.


पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या आश्वासनानंतर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन मागे ,अंबाजोगाईतील बेमुदत ठिय्या आंदोलनाचा पाचव्या दिवशी समारोप

अंबाजोगाई (प्रतिनिधी):
सखोल चौकशीनंतर आणि अहवाल प्राप्त होताच उपविभागीय पोलिस उपाअधिक्षक जायभाये यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल,डीवायएसपी जायभाये यांना तोपर्यंत रजेवर पाठविले जात आहे असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा पालकमंञी ना.धनंजयजी मुंडे यांनी दूरध्वनीवरून आमदार संजयभाऊ दौंड यांच्या मार्फत दिल्यानंतर अखेर अंबाजोगाईत सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अ‍ॅड.माधव जाधव यांनी दिली आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईत आज राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा पालकमंञी ना.धनंजयजी मुंडे यांचे वतीने आमदार संजयभाऊ दौंड,नगरसेवक बबनराव लोमटे,दत्तात्रय पाटील,आबासाहेब पांडे यांनी मध्यस्थी करीत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अ‍ॅड.माधव जाधव,अ‍ॅड.अजित लोमटे,ॲड.संतोष लोमटे,वैजेनाथ देशमुख,प्रविण ठोंबरे,प्रशांत आदनाक,अभिजीत लोमटे,अ‍ॅड.भागवत गाठाळ,विजयकुमार गंगणे,रविकिरण देशमुख,भीमसेन लोमटे,प्रा.प्रशांत जगताप,ॲड.प्रशांत शिंदे,ईश्वर शिंदे आदींसह इतर उपस्थित सर्वच समन्वयकांशी सकारात्मक चर्चा केली.याप्रसंगी प्रशासनाचे वतीने अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर,उपविभागीय अधिकारी शरद झाडके हे देखिल चर्चेत सहभागी झाले.यावेळेस आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी त्यांनी सकारात्मक चर्चा केली.या घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आणि तोपर्यंत डीवायएसपी जायभाये यांना रजेवर पाठविले जात आहे असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा पालकमंञी ना.धनंजयजी मुंडे यांनी दूरध्वनीवरून आमदार संजयभाऊ दौंड यांच्यामार्फत आंदोलकांना दिल्यानंतर अंबाजोगाईतील बेमुदत ठिय्या आंदोलन अखेर पाचव्या दिवशी मागे घेण्यात येत असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अ‍ॅड.माधव जाधव यांनी उपस्थित सकल मराठा समाज बांधवांसमोर दिली.याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाची दखल घेतल्याबद्दल पालकमंञी ना.धनंजयजी मुंडे,आमदार संजयभाऊ दौंड,आमदार नमिताताई मुंदडा,आमदार सुरेश धस,आमदार विनायकराव मेटे,माजी मंञी पंकजाताई मुंडे यांच्यासह सर्व आजी माजी आमदार, लोकप्रतिनिधी,प्रसारमाध्यम,विविध पक्ष आणि संघटना यांचे आभार मानले.

यांनी दिला आंदोलनास पाठींबा

रविवारी सुरू असलेल्या या आंदोलनास शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे,आमदार संजयभाऊ दौंड,शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड,दत्तात्रय पाटील,काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख,राहुल सोनवणे,ॲड.इस्माईल गवळी,शेख वजीर,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के,अशोक ठाकरे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे,प्रा.दत्तात्रय मोरे,अमित घाडगे,पंजाबराव देशमुख शिक्षक परीषदेचे अनंत पिंगळे,ॲड.शरदराव लोमटे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीदादा कुलकर्णी,तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे,शहरप्रमुख गजानन मुडेगावकर,अशोक गाढवे यांच्यासह विविध पक्ष व संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे मुख्यसंयोजक प्रदीप सोळुंके यांनी पाठिंबा दिला.रविवारी वाघाळा,मुडेगाव,राडी,वाघाळवाडी,दैठणा या गावचे मराठा समाज बांधव,कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

ठिय्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बाईक रॅली :-

अंबाजोगाई येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी होवून पाठिंबा देण्यासाठी होळ येथील मराठा समाज बांधवांनी होळ (केज) ते अंबाजोगाई अशी बाईक रॅली काढून आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला

घाटनांदुर येथे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन :-

अंबाजोगाई येथील पोलीस उपअधीक्षक आणि त्यांच्या सहका-यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस प्रशासनातील वाईट प्रवृत्तीचा निषेध करीत घाटनांदुर येथे मराठा समाज बांधवांनी वादग्रस्त पोलीस उपअधीक्षक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.