आठवडा विशेष|प्रतिनिधी
बीड दि. 26:- जिल्हयाच्या विकासासाठी जिल्हयात दळवळणाची चांगली सुविधा निर्माण होणे गरजेचे असून जिल्हयात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे रस्त्याचे जाळे निर्माण होत आहे. रस्ते विकासामुळे दळवळणाची चांगली सुविधा निर्माण होणार असल्याने याचा फायदा जिल्हयातील नागरिकांना होणार आहे. तसेच अपुऱ्या पावसामुळे निर्माण होणाऱ्या दुष्काळसदृष्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हयात जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात करण्यात येत आहेत. ही कामे पूर्ण झाल्यास येणाऱ्या काळात आपला जिल्हा निष्चितच दुष्काळमुक्त होईल, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 69 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दि. 26 जानेवारी 2019 रोजी सकाळी ठिक 9.15 वाजता पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समांरभ बीड येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर संपन्न झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार सुरेश धस, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधिक्षक जी श्रीधर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती युध्दाजित पंडित, समाजकल्याण सभापती संतोष हंगे, महिला व बालकल्याण सभापती शोभाताई दरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होती.
यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की,बीड जिल्हयात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे मोठया प्रमाणात सुरु असून जिल्हयातील 1 हजार 284 कि.मी. लांबीच्या 330 रस्त्यासांठी रुपये 741 कोटी निधी मंजूर असून त्यापैकी 281 कामे प्रगतीपथावर आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या 950 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची 6 हजार 143 कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. नगर-बीड-परळी रेल्वेची कामेही युध्दपातळीवर सुरु असून त्यासाठी रुपये 2 हजार 200 कोटींचा निधी मंजूर आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे राज्यातील ज्या शेतकऱ्यांना त्यांचे पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज परतफेड करता आले नाही अशा शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 चा लाभ बीड जिल्हयातील एकूण 2 लाख 17 हजार 222 लाभार्थी खातेदारांना 1132.29 कोटीचा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे. जिल्हयामध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला असून हा प्रकल्प दोन टप्प्यात रावविण्यात येत असून जिल्हयातील 391 गावांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जलयुक्त शिवार या अभियानाची बीड जिल्हयात प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. सन 2015-16 ते 2017-18 या तीन वर्षात जिल्हयातील एकूण 722 गावातील 15 हजार 596 कामांवर 358 कोटीचा निधी खर्च झालेला आहे. तसेच सन 2018-19 मध्ये 288 गावांची निवड करण्यात आली असून या गावामध्ये 126.63 कोटीची 2 हजार 934 कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यापैकी 756 कामे पूर्ण तर 606 कामे प्रगती पथावर आहेत. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत बीड जिल्हयात आतापर्यंत 7 हजार 161 शेततळे पूर्ण झाली आहेत. आपल्या जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढत असून ते आता 927 इतके झाले आहे. आणखी वाढ होण्यासाठी केंद्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेल्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा जिल्हावासियांनी लाभ घ्यावा, आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले. ग्रामविकास विभागाच्या अत्यंत महत्वाकांक्षी अशा अस्मिता योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळामधील किशोरवयीन मुलींना ५ रुपये या दराने आणि ग्रामीण भागातील महिलांना सवलतीच्या किंमतीत उत्कृष्ट दर्जाचे सॅनिटरी नॅपकीन पुरविण्यात येत आहेत. असे सांगून जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची ११ तालुक्यामध्ये अंमलबजावणी सुरु असून उमेदच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बचतगट तयार करुन महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्हयात 11 हजार 133 नवीन महिला बचतगट सुरू होवून या बचतगटांना 17 कोटी 14 लक्ष 33 हजार रुपये निधीचे वाटपही करण्यात आले याशिवाय 5 हजार 282 बचतगटांना बँकेकडून 58 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. या बचतगटांना सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत बँकांमार्फत शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या भव्य व सुसज्ज इमारत बांधकामासाठी 23 कोटी 35 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून इमारत बांधकाम प्रगतीपथावर आहे. जिल्हयातील 8 पंचायत समित्यांच्या आधुनिक इमारतीच्या बांधकामासाठी 33 कोटींचा तर कर्मचारी निवासस्थानासाठी 21 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या इमारती नाहीत त्या ग्रामपंचायतींना बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत ग्रामपंचायत इमारती बांधण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला 12 ते 18 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत बीड जिल्हयातील 300 वस्त्यांसाठी रुपये 144 कोटींच्या 249 ग्रामीण पेयजल योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. जिल्हयातील पूस 20 खेडी पाणीपुरवठा योजना व पट्टीवडगाव 9 खेडी पाणीपुरवठा योजनांची विशेष बाबम्हणून पुनर्जीवन व थकीत विद्युत बिलासह रुपये 10 कोटी 24 लक्ष निधीस मंजूरी देण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बीड जिल्हा 100 टक्के शौचालयमुक्त झाला असून 1 लक्ष 63 हजार शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत व यासाठी 195 कोटी 60 लक्ष निधी खर्च करण्यात आला असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
जिल्हयातील मोडकळीस व जीर्ण शाळांना नवी उभारी देण्यासाठी क्रांतीज्योती शाळा कायापालट योजनेतंर्गत रुपये 25 कोटी 20 लक्ष निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा महत्वाकांक्षी उपक्रम जिल्हयात राबविण्यात येत आहे. 14 वा वित्त आयोग, लोकसहभाग व इतर माध्यमातून जिल्हा परिषदेच्या एकूण 2 हजार 567 शाळांपैकी 1 हजार 652 शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. समग्र शिक्षा अभियानातंर्गत सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी 488 हंगामी वसतिगृहे सुरु केली असून यामध्ये 26 हजार 121 विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्हयास हंगामी वसतिगृह योजनेंतर्गत 2 हजार 884 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या उपक्रमांतर्गत या वर्षात जिल्हयातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील स्वच्छतागृहांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी 278 लक्ष निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हयातील खेळाडूंना आधुनिक क्रीडा सुविधा देण्यासाठी शासनाने जिल्हा क्रीडा संकुलाला 2 कोटी 25 लक्ष रुपयांचा तर जिल्हयातील अंबाजोगाई,गेवराई, पाटोदा, धारुर आणि बीड या तालुक्याच्या तालुका क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून क्रीडा संकुलाची कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्हयात आतापर्यंत 54 लक्ष 25 हजार वृक्षलागवड झालेली असून बीड जिल्हयाचे राज्यात हे काम उल्लेखनीय झाले आहे. स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत 90 विमा प्रस्ताव मंजूर करण्यात आले तर 184 प्रस्ताव विमा कंपनी स्तरावर प्रकियेत आहेत. असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत श्रीक्षेत्र नारायणगडाच्या विविध विकास कामांकरीता 25 कोटीं, कपिलधारसाठी 10 कोटी व परळी वैजनाथ तीर्थक्षेत्रासाठी 100 कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा निधी मंजूर करण्यात आला असून भगवान भक्तीगड व गोपीनाथगडाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत.राष्ट्रीय रुरबन मिशनअंतर्गत परळी तालुक्यातील सिरसाळा समुहातील 23 गावांसाठी रुपये 101 कोटींचा आराखडा तर आष्टी तालुक्यातील कडा समूहातील 21 गावांसाठी रु. 116 कोटींचा आराखडा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, जेष्ठ नागिाकांची व उपस्थित मान्यवरांची भेट घेवून त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस दलाच्या प्लाटूनसह विविध विभाग, शाळा आणि महाविद्यालयांचे परेड संचलन झाले. यामध्ये जिल्हा पोलीस दल, आर.सी.पी, महिला पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, सैनिकी विद्यालय, स्काऊट-गाईड, पोलीस बँड, आदि पथकांचा समावेश होता. तसेच महिला गस्त पथक, अग्नीशमन पथक, सर्व शिक्षा अभियान, स्वच्छ भारत मिशन व जिल्हा रुग्णालय, सामाजिक वनिकरण यांच्यासह विविध विभागाच्या चित्ररथाचे संचलन झाले. विविध शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.संगीता धसे यांनी केले. या कार्यक्रमास नागरिक, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व पदाधिकारी, शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.